चंद्रपूर/प्रतिनिधी:
संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षलागवड ही एक चळवळ झाली असून पुढच्या पिढीसाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचे प्रत्येक नागरिकाची भावना आहे. मात्र हा मनामनातील वृक्ष लागवडीचा संदेश वननिर्मितीत परावर्तीत होऊ दया, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेमार्फत आयोजित वृक्षदिंडीची सुरुवात करण्यापूर्वी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. या वृक्षदिंडीच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने चंद्रपूर जिल्हयात सलामी दिली.
चंद्रपूर जिल्हा परिषदेने राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहीमेमध्ये 12 लक्ष वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद 1571 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना एक झाड लावायला देणार आहे. त्याची निगा राखण्यासाठी वृक्षसंवर्धन कृषी कार्यक्रम तयार करण्यात आला असून महिनावार या रोपाची निगा राखल्याची माहिती भरता यावे, असे रिपोर्टकार्ड तयार करण्यात आले आहे असेच रिपोर्टकार्ड कर्मचा-यांनाही देण्यात आले आहे. या दोन्ही रिपोर्टकार्डचे प्रकाशन ना.मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमानंतर पावसाळी वातावरणात आज उत्साहात या दिंडीला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करतांना पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज वनाचा मोठया प्रमाणात होणारा –हास बघता वृक्ष लागवड किती आवश्यक आहे, याबाबत जागरुकता निर्माण करणे गरजेचे असून राज्यभर वृक्ष लागवड मोहीमेला उत्सवाचे स्वरुप आले आहे. चंद्रपूर जिल्हयाने गेल्यावर्षीही 4 कोटी वृक्ष लागवडीमध्ये भरीव कार्य केले होते. यावर्षी देखील 13 कोटी वृक्ष लागवडीमध्ये या जिल्हयाकडून मोठया प्रमाणात अपेक्षा व्यक्त करतो. या वृक्ष लागवडीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेला संकल्प सिध्दीस जावो, त्यांच्या नियोजनात ही मोहीम यशस्वी होवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. भरपावसातही मोठया संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती अर्चना जिवतोडे, गोदावरी केंद्रे, ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक रविंद्र शिवदास, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवडीच्या मोहीमेला बळकटी देणा-या ग्रीनआर्मी नोंदणीला जिल्हयामध्ये उत्स्फूर्तप्रतिसाद असून 8500 वृक्षप्रेमींची नोंद करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचारी व प्रत्येक विद्यार्थी एक झाड लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वच्छता अभियानातंर्गत संपूर्ण हागणदारीमुक्त जिल्हयाची उपलब्धीही अभिमानाने नमूद केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संबोधित करतांना ना.सुधीर मुगंटीवार यांनी सुरु केलेल्या लोकचळवळीला 12 लक्ष वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाने बळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. आतापर्यंत कोणत्याही वनमंत्र्यांनी अशा पध्दतीच्या मोहीमेला हाती घेतले नव्हते. महाराष्ट्राला हिरवेगार करण्याचे स्वप्न ना.मुगंटीवार यांनी पाहिले असून राष्ट्रीय सणासारखा उत्साह जनतेमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या 1571 शाळांमध्ये 1 लाख 25 हजार विद्यार्थी एक झाड लावणार व जगवणार आहे. कर्मचारी देखील हाच कित्ता गिरवणार आहेत.
आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी संबोधित करतांना वनमंत्री झाल्यापासून ना.मुनगंटीवार यांनी 2 कोटी, 4 कोटी आणि आता 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प घेतला असून मागील मोहीमेप्रमाणेच यावर्षी देखील ही मोहीम यशस्वी होईल. ना.मुनगंटीवार यांच्यामुळे कधीकाळी मागास जिल्हयाचे बिरुद लागलेल्या चंद्रपूर जिल्हयामध्ये आता जागतिक स्तरावरचे उपक्रम, योजना राबविल्या जात आहे. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या वाढली. पर्यटक वाढले, वेगवेगळया योजना, उपक्रमातून जिल्हयाचे नांव जागतिक स्तरावर गेले आहे. यासाठी चंद्रपूरची जनता आपले अभिनंदन करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या चित्ररथाला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.