नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारूसह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी सकाळी सावंगी पोलिसांनी केली.
पांढरकवडा पारधी बेड्यावर गावठी मोह दारू गाळून त्याची विक्री वर्धा शहर परिसरातील अनेक गावांमध्ये केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनुसार, सावंगी पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्त्वात पांढरवडा पारधी बेड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दारूविक्रेत्यांकडून जमिनीत लपवून ठेवलेला कच्चा मोहरसायन सडवा शोधून तो नष्ट केला. शिवाय काही ठिकाणी दारू गाळण्याचे साहित्य आढळून आल्याने व गावठी मोहाची दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी दारूविक्रेता रमेश चिमणे, शिंडू भोसले, शरद ठाकरे, इंद्रपाल भोसले याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपींविरुद्ध सावंगी पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सावंगी (मेघे) ठाण्यातील पोलिसांनी केली.
आॅटोसह ३.६७ लाख रूपयांचा दारूसाठा पकडला
समुद्रपुर- येथील हिंगणघाट-उमरेड मार्गावर पोलिसांनी सापळा रचुन अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या आॅटोला अडवून वाहनातील विदेशी दारूसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी आॅटोसह ३ लाख ६७ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय दारूची वाहतूक करणाºया तिघांना अटक करण्यात आली.
बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणाºया एम.एच.३१ टी.सी. १०८ या आॅटोची पोलिसांनी वाहन अडवून पाहणी केली. पाहणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तो पोलिसांनी जप्त केला आहे. आॅटोतून पोलिसांनी विदेशी दारू किंमत ५७ हजार ६०० रुपये तसेच ३३ हजार ६०० रुपये किंमतीची बियर तसेच आणखी काही दारूसाठा असा एकूण ३ लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात दारूची वाहतूक करणाºया शेख शाहिद शेख खालिद (२८) रा. नागपूर, निलेश हरिचंद्र निकोडे (२९), इम्रान अमान उल्हास खान पठाण (२९) रा. चंद्रपूर यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात समुद्रपुरचे ठाणेदार प्रविण मुंडे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण लिंगाडे, पोलिस उपनिरीक्षक माधुरी गायकवाड, सचिन रोकडे, राजू जयसिंगपुरे, चरडे, कृष्णा इंगोले यांनी केली.