केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर व आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची उपस्थिती
चंद्रपूर/प्रतिनिधी:
‘शौर्य मिशन’’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर सर करून चंद्रपूर या आदिवासी बहुल व ऐतिहासिक वारस्याचा धनी असलेल्या जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावत आपल्या या शौर्याचा नवइतिहास अखिल भारतीय स्तरावर पोहचविणाऱ्या आदिवासी विद्याथ्र्यांची दखल अखेर राष्ट्राची शान असलेल्या राष्ट्रपती भवनाने घेतली व महामहीमांच्या शुभहस्ते हे आदिवासी वीर सन्मानित झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तूरा खोवला गेला आहे.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार देशाचे गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये एव्हरेस्ट वीर ठरलेल्या मनिषा धुर्वे, विकास सोयाम, प्रथमेश आडे, कवीदास काठमोडे, उमाकांत मडावी व इतरांचा राष्ट्रपती कोविंद यांनी भेटवस्तू देवून सन्मान केला. त्यांच्या असामान्य शौर्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून या विद्याथ्र्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून आदिवासींच्या शौर्याच्या इतिहासाला अजरामर केल्याची भावना या प्रसंगी व्यक्त केली. या शुरांच्या शौर्याची महती हा देश सदैव स्मरणात ठेवेल, लाखो युवक त्यांच्या या शौर्यातुन प्रेरणा घेतील असेही राष्ट्रपती कोविंद यांनी गौरवोद्गार काढले.
आदिवासी या पे्ररणा व आनंददायी सोहळ्याला आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, चंद्रपुरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील व एव्हरेस्ट सर करतांना माघार घ्यावी लागलेल्या इंदू कन्नाके, अक्षय आत्राम, शुभम पेंदोर यांचीही या विशेष सन्मान सोहळ्याला उपस्थिती लाभली होती. राष्ट्रपती महोदयांशी हितगुज करतांना या वीर युवकांनी आपल्या एव्हरेस्ट चढाई प्रसंगीचे अनुभव कथन केले. आमच्यासाठी हा अत्यंत मौल्यवान ठेवा असल्याच्या भावना या विजयश्री संपादन केलेल्या आदिवासी एव्हरेस्ट वीरांनी व्यक्त करून आमच्या या यशात जिल्ह्यातील व सहकार्याप्रती सदैव ऋणी राहू अशी भावना या सोहळा प्रसंगी व्यक्त केली.