मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वाढदिवसाचे फलक लावु नका अन्यथा तर पक्षातून हकालपट्टी करू , असा दम भरला. मात्र, यां आदेशाचे मनसे कार्यकर्त्यांनी पालन केलेले नाहीं। साहेबांच्या आदेशानंतरही मनसे चा फलकराज चंद्रपुरात सुरु आहे
महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचे फलक शहरात दिवसभर होते. साहेबांचा आदेश दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला. काहींनी आदेश येताच शुभेच्छा फलक हटविलेसुद्धा. मात्र, गायकवाड यांना आपले शुभेच्छा फलक लागेल, याची कल्पना नसावी. त्यामुळे दिवसभर शहरातील मुख्य चौकांत त्यांना शुभेच्छा देणारे फलक लागले होते. पक्षांतर्गत विरोधकांनी वरिष्ठांकडे या शुभेच्छा फलकांचे छायाचित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचते केले.
पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून त्या पक्षातर्फे रिंगणात उतरल्या होत्या. गायकवाड यांना केवळ दोन हजारांच्या आसपास मते मिळाली. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी शहरात त्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. दरम्यान, आज राज ठाकरे यांनी पुणे येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना यापुढे चमकोगिरी बंद करण्याचा आदेश दिला. विशेषत: चौकाचौकांत लावल्या जाणाऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर त्यांचा विशेष आक्षेप होता.