मुंबई दि. 18: राज्य कर्जमुक्त करण्यासाठी शासन बांधील असून विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल वाढीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
काल वित्तमंत्र्यांनी विक्रीकर विभागाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. मुनगंटीवार यांचा विक्रीकर विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर, विशेष विक्रीकर आयुक्त चंद्रशेखर ओक, मुख्य दक्षता अधिकारी विनय कारागावकर यांच्यासह विक्रीकर राजपत्रित अधिकारी संघटनेचे डॉ. अरूण बिराजदार, डॉ. महेश चंदूरकर, विक्रीकर कर्मचारी संघटनेचे मिलिंद सरदेशमुख, सुबोध किर्लोस्कर, गट ड कर्मचारी संघटनेचे पोपट कांबळे, मुकुंद पवार यांच्याासह विक्रीकर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विक्रीकर विभागाने सन 2013-14 या आर्थिक वर्षातील 70 हजार कोटी रुपयांच्या महसूल संकलनाचा लक्ष्यांक पूर्ण केल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विभागाने 2014-15 साठीचा 80 हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट तर पूर्ण करावेच पण राज्याच्या आर्थिक सक्षमतेसाठी एक लाख कोटीचा टप्पा पूर्ण करावा. राज्याचा आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आपण सर्वजण मिळून निर्धाराने यशस्वी करू असे सांगतांना वित्तमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यासाठी मार्गदर्शनही केले.
कल्याणकारी राज्याच्या उभारणीमध्ये शासनाचे हात मजबूत करणारा हा विभाग असल्याचे सांगतांना त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रास्त व न्याय्य मागण्यांसदर्भात संघटनांबरोबर चर्चा करण्यात येईल व त्यांचे प्रश्न सकारात्मकदृष्टया सोडवले जातील असे त्यांनी सांगितले.
विक्रीकर विभागातील रिक्त पदे आणि पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत घेण्यात येतील, असे अपरमुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले.
राज्याच्या महसूल वाढीसाठी विक्रीकर विभागातील रिक्त पदे व पदोन्नत्यासंबंधीचे निर्णय लवकर घेण्यात यावेत असे प्रतिपादन करतांना विक्रीकर आयुक्त डॉ. नितीन करीर यांनी गेल्या दोन वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतांनाही कामाचा निपटारा वेगाने करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केला.