महाकाली यात्रेत भाविकांची गैरसोय होणार नाही
याची काळजी
घ्यावी –
जिल्हाधिकारी विजय वाघमारे
चंद्रपूर दि.07- 16 ते 26 एप्रिल दरम्यान होणा-या महाकाली
यात्रेत भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी
विजय वाघमारे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
चंद्रपूर येथे महाकाली
यात्रेला 16 एप्रिल पासून सुरुवात होणार असून
ही यात्रा एक महिना सुरु असते. परंतु 16 एप्रिल ते 26 एप्रिल 2013 या कालावधीत मोठया
प्रमाणात भाविक महाकाली यात्रेसाठी चंद्रपूरात येतात. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था
राखण्याचे दृष्टीने करावयाच्या उपायोजनेबाबत जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांचे
अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा
पोलीस अधिक्षक राजीव जैन, अतिरीक्त जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी
उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, पोलीस अधिक्षक (गृह) श्रीराम तोडासे, उपप्रादेशिक
परीवहन अधिकारी श्री.गुडावार, महानगरपालिकेचे उपआयुक्त श्री.देवतळे, उपविभागीय
पोलीस अधिकारी डॉ.भुजबळ उपस्थित होते.
चंद्रपूर येथे
होणा-या यात्रेत भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासोबतच मंदिराच्या
परिसरात व इतरही ठिकाणी भाविकांची योग्यप्रकारे व्यवस्था करण्यात यावी अशा सुचना
दिल्या. पिण्यासाठी व स्नान
करण्यासाठी विविध ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच महिलांसाठी वेगळे शौच्छालय उपलब्ध करुन
दयावेत अशाही सूचना जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी बैठकीत महानगर पालिकेच्या
अधिका-यांना व विश्वस्थ मंडळाच्या पदाधिका-यांना दिल्यात.
यात्रेच्या परिसरात वाहतूकीचा भाविकांना अडथळा निर्माण होणार नाही याची
दक्षता पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. महाकाली यात्रेच्या परिसरातील विद्युत लाईनची
व्यवस्था निट राहील याची काळजी महाराष्ट्र विद्युत विभागाने घ्यावी व यात्रेचे
ठिकाणी 24 तास कर्मचारी उपस्थित ठेवावे असे त्यांनी सांगीतले.
यात्रेत
निरनिराळया अशासकीय संस्था/सेवाभावी संस्थातर्फे भोजनदान व इतर खाद्य पदार्थ/महाप्रसाद
वाटप केल्या जाते. अशा अशासकीय संस्था/सेवाभावी संस्थांनी अन्न व प्रशासन
विभागाकडून अन्न परवाना घेवूनच महाप्रसादाचे वाटप करावे. ज्या संस्था अथवा सेवांभावी संस्थांनी अन्न
परवाना काढला नसेल अशा संस्थांना मंदिर परिसरात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येवू
नयेत. त्याचप्रमाणे
अन्न व औषध विभागाने खाद्य प्रदार्थामध्ये विषबाधा होणार नाही याची दक्षता
घ्यावी. प्रामुख्याने प्रसादाचे बर्फीमध्ये जास्त भेसळ होण्याची शंका असल्याने
त्याबाबीकडे विशेष लक्ष दयावे अशाही सुचना देण्यात आल्या.
यात्रे दरम्यान
मंदीर गाभारा परीसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विश्वस्थ मंडळाने अंदाजे
200 स्वयंसेवक ठेवावे. त्यांना एकाचप्रकारचे
गणवेश देवून विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात अशाही सूचना
विश्वस्थ मंडळाला देण्यात आल्या आहेत.
या बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व विश्वस्थ मंडळाचे पदाधिकारी
उपस्थित होते.