बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू - अडेगावातील मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांचा नकार , बिबट्याचा बंदोबस्त करण्याचा निर्धार
चंद्रपूर दि.१० (प्रतिनिधी):
एन तेंदूपाने तोड व मोह्फुले वेचणीच्या हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ पराकोटीला पोहचला आहे. बिबट्याने आज अडेगावात दोन लोकांचा जीव घेतलाय. या सोबतच गेल्या २० दिवसात बिबट्याने घेतलेल्या बळींची संख्या ४ झाली आहे. आज सकाळी ताडोबा लगत असलेल्या आगरझरी-आडेगाव येथे तुकाराम धारणे हा ६० वर्षीय इसम मोहफूल गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता बिबट्याने त्याचावर झडप घालून त्याचा जीव घेतला. विशेष म्हणजे वनविभाग, पोलिस या घटनेचा पंचनामा करत असतांनाच ही घटना पाहायला आलेल्या सत्तर वर्षीय मालनबाई मुनघाटेवर बिबट्याने हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला.या दोन्ही घटना झाल्या त्याचं अंतर अवघं ५० फूट आहे. लागोपाठ झालेल्या या घटनेने वनविभाग, पोलिस, आणि गावकरी अक्षरश: हादरून गेले.
---------------------------------------------------------------------------------------------------------
चंद्रपूर शहरालगतच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशदारावरील आगरझरी या गावातील अडेगावच्या जंगलात मोहफुले वेचणा-या तुकाराम धारणे या ६० वर्षीय इसमाचा आज सकाळी ८ च्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हि वार्ता गावात पसरताच या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र झाले होते. विशेष म्हणजे वनविभाग, पोलिस या घटनेचा पंचनामा करत असतांनाच ही घटना पाहायला आलेल्या सत्तर वर्षीय मालनबाई मुनघाटेवर बिबट्याने हल्ला करून तिचाही फडशा पाडला. सर्वांच्या देखत बिबट्याने दुसरा हल्ला केल्यावर ग्रामस्थ संतापले असून बिबट्याचा बंदोबस्त व मृतकांना नुकसान- भरपाई च्या मागणीसाठी स्थानिकांनी ताडोबा मार्ग काही काळ रोखून धरला. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यामुळे जंगलालगतच्या भागातील ग्रामस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण आहे. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात आदिवासी व जंगलात राहणा-या नागरिकांचा मोहफुले वेचण्याचा वार्षिक हंगाम सुरु झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महिला-पुरुष या कामासाठी सध्या जंगलात जात असतात. याच काळात दरवर्षी मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे लक्षात येते. मात्र ताजा प्रकार वेगळाच असल्याची वनविभागात कुजबुज आहे. विशेष म्हणजे आज दोन जणांचा जीव घेणारा बिबट हा सावली तालुक्यात दोन महिलांना मारणारा ३ वर्षाचा मादी बिबट असल्याचीखात्रीलायक माहिती आहे. सावली परिसरातील उसरपार गावात २४ मार्चला अनुसया शेंडे या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते तर त्याच्या ५ दिवस आधी पालेबारसा येथील सुशीला दंडाजे नावाच्या महिलेवर अशाच प्रकारे जंगली श्वापदाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून एका बिबट्याला जेरबंद केले होते. २५ मार्च रोजी वन विभागाने अडीच वर्षे वयाची मादी बिबट पिंजरा लावून घटनास्थळी जेरबंद केली होती. हि मादी बिबट वन विभागाने दुस-या दिवशी सादागडलगतच्या मुरमाडीच्या जंगला सोडली. ६ एप्रिल रोजी याच बिबट्याने सादागड गावातील एका महिलेला शनिवारी सकाळी ठार केले. ध्रुपदाबाई मडावी नावाची ही महिला जंगलात मोहफूल वेचत असतांना एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर या गावात मोठा तणाव पसरला होता पण वनविभागाने लगेच या भागात पिंजरा लावून ७ एप्रिलला पुन्हा एकदा बिबट्याला जेरबंद केले. हा बिबट्या पुन्हा एकदा आगरझरीलगतच्या गिरघाटच्या जंगलात सोडल्याची माहिती आहे व याच बिबट्याने आज आणखी २ लोकांचा जीव घेतल्याचा दाट संशय आहे. बिबट्या नरभक्षक झाल्याचे माहित असूनही वनविभागाने एकाच बिबट्याला वेगवेगळ्या जंगलात सोडल्याने एकाच बिबट्याच्या हल्ल्यात ४ मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. सध्या या गावात तणाव असून पुढचे ३ महिने अशा भीतीच्या वातावरणात राहायचे कसे असा सवाल ग्रामस्थापुढे उभा ठाकला आहे.
दरम्यान या गावात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोचलेल्या वरिष्ठ वनाधिका-यांपुढे ग्रामस्थांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. एक नरभक्षक बिबट्या या भागात आणल्यानेच हा हल्ला झाल्याचे ग्रामस्थांनी उच्चरवात सांगितले. यात तथ्य असल्याने वरिष्ठ वनाधिकारी या मुद्यावर काहीही बोलण्यास तयार नव्हते. मृत ग्रामस्थांच्या परीवारास नुकसानभरपाई व तातडीची आर्थिक मदत दिली जात असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावलं जात असल्याचे वनाधिका-यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.
या घटनेनंतर या गावात प्रचंड तणाव असून पोलिस, वनविभाग आणि दंगा नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.