चंद्रपूरच्या जंगलात सलग आठवा मृत्यू -
२२ दिवसातील आठवा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा हल्ला झालाय. शहरापासून जवळच असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील किटाळी या गावात शेतीकामासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्यावर तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या २२ दिवसाच्या आत वाघ-बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांची संख्या आता ८ वर पोचली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याची ताजी घटना शहरालगतच्या किटाळी गावातील आहे. हे गाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर आहे. सकाळी १० च्या सुमारास ५० वर्षीय गोपिका काळसर्पे हि महिला गावातून आपल्या शेतीकामासाठी निघाली होती. काही दूरवर जंगलात गेल्यावर बिबट्याने या महिलेवर थेट हल्ला केला. या भागात गस्तीवर असलेल्या इको-प्रो या वन्यजीव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही वेळ आधीच या महिलेला जंगलात जाण्यास रोखले होते. मात्र तिने यास नकार दिला. या महिलेचा ओरडा ऐकून वनविभाग व वन्यजीव सदस्य आवाजाच्या दिशेने धावले. या सदस्यांनी महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. व थेट चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात नेले. इकडे लोकांनी या हत्येनंतर सततच्या घटनांना संतापून रस्ता रोको केला. काही काळाने हा बिबट्या याच भागात एका पाईप मध्ये बसून असलेला आढळून आला. लोकांनी या दिशेने चाल केली. लोकांचा गलका वाढल्यावर हा बिबट्या सर्वांदेखत पळून गेला. या घटनेने लोकांचा रोष आणखी वाढला. त्यांनी मिळेल त्या साधनाने जंगलाला आग लावणे सुरु केले.यात सर्वप्रथम बिबट्याला पकडण्यासाठीची जाळी भक्ष्यस्थानी पडली. लोकांचे उग्र रूप पाहून वन विभागाच्या कर्मचा-यांनी पळ काढला. तब्बल ४ तास वन विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळी पोचला नाही.
सध्या किटाळी भागातील जंगल ग्रामस्थांनी लावलेल्या आगीमुळे राख होत आहे.सध्या जंगल व त्यातील वन्यजीव यांना वाचविण्यासाठी या भागात भीतीपोटी एकही अधिकारी ,वन्यजीव सदस्य उस्थित नाही. हल्ल्याची सलग मालिका सुरु असताना वरिष्ठ अधिकारी जंगलात पोचत नाहीत त्यामुळेच रोषात भर पडत आहेत. आता वन्यजीव संघटना या समस्याग्रस्त बिबट्याला गोळ्या घालून संपविण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.