बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
लालपेठ परिसरात बिबट्याची दहशत
यावर्षीचा नववा बळी
चंद्रपूर दि. ०७ :
चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात आज सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आलाय. या महिलेवर या परिसरात नव्यानेच आढळणा-या बिबट्याने हल्ला केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून घटना निवासी परिसरात घडल्याने नागरिक धास्तावले आहेत.
गेले काही महिने हा बिबट्या या परिसरातील नागरिकांना दर्शन देत होता. चन्द्रपुर शहराच्या सीमावर्ती भागातील लालपेठ भाग कोळसा खाणीनी वेढलेला आहे. या भागात कोळसा काढताना तयार झालेले मातीचे प्रचंड मोठे ढिगारे आहेत. सोबतच काही बंद पडलेल्या खाणीत पाणीसाठा एकत्र झाला आहे. या खाणींच्या आसपास छोटी खेडी आहेत. या खेड्यांमध्ये असलेली भटकी कुत्री बिबट्याचे आवडते खाद्य आहे. म्हणूनच बिबट्याचा या भागातील वावरही वाढला आहे. काल रात्री हा बिबट्या या परिसरात काही नागरिकांना नजरेस पडला होता. मात्र आज सकाळी या भागात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांना हा मृतदेहच दिसला. अंदाजे ४५ वर्षे वयाच्या या महिलेच्या शरीराचे काही भाग बिबट्याने खाल्ल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिका-यांनी परिसरात तळ ठोकला असून नागरिकांनी केलेल्या पिंज-याच्या मागणीवर विचार केला जात आहे. एप्रिल चा पूर्ण महिना चंद्रपूर वनविभाग वाघ व बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी हादरून गेला होता. यावर्षीच्या बिबट्या व वाघ हल्ल्याच्या घटनेत आता बळींची संख्या ९ वर पोचली आहे. चंद्रपूरच्या सीमावर्ती भागात हल्ला करणा-या या बिबट्याचा बंदोबस्त न झाल्यास या भागातही नवे संकट उभे ठाकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.