वरोरा- शेतीचा हिस्सा मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोन भावांनी संगनमत करून तिसर्या भावाला बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या शेगाव (खु) गावात काल अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी असलेल्या दोनही भावांना अटक केली आहे.
शेगाव (बु.) येथील सूर्यकांत मधुकर दोहतरे (३५), सुनील मधुकर दोहतरे (३८) व अनिल मधुकर दोहतरे (४0) हे आपापल्या कुटुंबीयासह वेगळे राहतात. मात्र ते वडिलोपाजिर्त शेती एकत्रित करीत होते, १३ मे रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास अनिल दोहतकरे याने त्याचा लहान भाऊ सूर्यकांत व सुनिल या दोघांना शेतीचा हिस्सा मागितला. यावरून तिघाही भावांत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात सूर्यकांत व सुनील या दोघांनी अनिलला लाकडी फळीने मारहाण केली. त्यात अनिल गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. मृतक अनिलची पत्नी वनिता दोहतरे हिने शेगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी मृताचे बंधू सूर्यकांत दोहतरे व सुनिल दोहतरे यांच्याविरुद्ध भादंवि ३0२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेचा तपास शेगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिलीप सूर करित आहेत.