সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 16, 2013

प्रदर्शनीमुळे बचत गटांना बाजार पेठेची संधी उपलब्ध


चंद्रपूर दि.16- महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उत्पादित होणा-या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी तेजस्वीनी स्वयंसहाय्यता जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीच्या  आयोजनामागचा हेतू होता.  मात्र आता महिला बचत गटांनी महानगरातील बाजार पेठा काबीज करण्यावर भर दयावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी केले.  ते स्वयंसहाय्यता महिला बचत गट प्रदर्शनी व विक्रीच्या समारोप प्रसंगी बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प संचालक अंकुश केदार व माजी उपशिक्षणाधिकारी जिलानी उपस्थित होते. 
      महिला बचत गट प्रदर्शनीच्या निमित्ताने महिलांची शक्ती दिसून पडली असे सांगून ग्रामीण भागातील उत्पादीत वस्तूमुळे प्रत्यक्ष महिला राज अवतरले असे निकम म्हणाले.  आपल्या वस्तूंचा दर्जा व गुणवत्तेमध्ये  सातत्य ठेवावे असे आवाहन निकम यांनी केले.  प्रकल्प कार्यालयाने बचत गटांना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्याची संधी प्राप्त करुन दिली असून त्या संधीचे सोन करण्याची जबाबदारी बचत गटावर आहे.  आता महानगराकडे लक्ष ठेवून वस्तूंची निर्मिती करावी असेही निकम म्हणाले. 
      चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनीच्या समारोपा प्रसंगी विसापूर येथील संजीवनी महिला बचत गटाच्या  सदस्या मंगला घाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  शासनाने प्रदर्शनीच्या माध्यमातून चांगली संधी उपलब्ध करुन दिल्याचे त्या म्हणाल्या.  आपल्या वस्तूंना एवढया मोठया प्रमाणावर ग्राहक मिळाला असल्यामुळे आर्थिक मिळकत झाल्याचे त्यांनी सांगितले.  अशा प्रदर्शनीमधून बचत गटांना प्रोत्साहन मिळते तसेच उत्पादीत वस्तूंना ग्राहक व बाजार पेठ लाभते त्यामुळे बचत गटाच्या आर्थिक उन्नतीस हात भार लागतो अशा भावना पिपर्डा येथील शालुताई धोटे यांनी व्यक्त केल्या. 
      चंद्रपूर जिल्हयात महिला बचत गट अतिशय सक्षमपणे कार्य करत असून त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू उत्तम व गुणवत्ता पूर्वक आहेत.  त्यांना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठीच या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.  चार दिवसात तब्बल 40 लाखाची विक्री झाल्याने हा हेतू सफल झाल्याचे प्रकल्प संचालक अंकुश केदार यांनी आपल्या  प्रास्ताविकात सांगितले.  याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सहभागी सर्व बचत गटांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.  तसेच प्रकल्प संचालक कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांचाही प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व प्रस्ताविक अंकुश केदार यांनी केले तर संचालन धनजय साळवे यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.