সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, January 03, 2013

...तर शिवसेनेची युती तोडा


...तर शिवसेनेची युती तोडा

चंद्रपूर - विदर्भाच्या वाट्याचे पाणी आंध्रप्रदेशचे शासन पळवीत असताना शिवसेना गप्प आहे. एकीकडे भाषिक मुद्द्यावर वेगळ्या विदर्भाला विरोध करायचा आणि दुसरीकडे विदर्भावर अन्याय झाला तरीही गप्प बसायचे, हे कुठवर सहन करायचे, असा सवाल करीत विदर्भात भाजप टिकवायचा असेल तर शिवसेनेसोबतची युती तोडली पाहिजे, असा थेट हल्लाबोल भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी केला.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राणहिता-चेवेल्ला सुजला श्रवंती' या नावाने आंध्र सरकार तुमडीहेटी या गावी प्राणहिता नदीवर बांधत असलेल्या धरणाचा विरोध भाजप-शिवसेना पक्षादरम्यान वादाचा विषय बनलाय. शिवसेना वेगळ्या विदर्भाला विरोध करते. मात्र, विदर्भावर अन्याय झाला की गप्प बसते. असे पूतनामावशीचे प्रेम काय कामाचे, असा थेट हल्ला चढवून शोभाताई फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे. आमदार फडणवीस यांनी भाजप आमदारांच्या मनातील अस्वस्थता प्रकट केली की, याच जिल्ह्यातील प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना अडचणीत आणले, यावर आता खल सुरू झालाय.
येथील विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत त्या म्हणाल्या, जेव्हा-जेव्हा विदर्भाच्या विकासाचा किंवा स्वतंत्र विदर्भाचा प्रश्‍न पुढे येतो, तेव्हा-तेव्हा शिवसेना त्याला विरोध करते. आज विदर्भात कुपोषण आहे, बेरोजगारी आहे, दुष्काळ आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या गाजत आहेत. अशावेळी आमच्या नद्यांतील पाणी पळवले जात असेल, तर आम्ही काय करायचे? पान गुंडाळून झाडावर बसून राहायचे काय? विदर्भाच्या मुळावर घाव घालणाऱ्या या चेवेल्ला प्रकल्पाला भाजप पूर्णपणे विरोध करेल. मात्र, यात शिवसेनेने सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे; पण आजवर असे कधीच घडले नाही. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करावी की नाही, याचा विचार आता पक्षाने करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेला न देता ती जागा भाजपने लढवावी, अशा हालचाली नागपूर जिल्ह्यात वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर शोभाताईंच्या या वक्तव्यामुळे भाजप-सेना युतीवर काय परिणाम होतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. मात्र, या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

"प्राणहिता-चेवेल्ला सुजला श्रवंती' या महाधरणाचे काम आंध्र सरकार करीत आहे. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमांवर वर्धा-वैनगंगा या दोन नद्यांचे पाणी एकत्र येत असलेल्या प्राणहिता नदीच्या संगमस्थळी आंध्रच्या तुमडी-हेटी गावात हे धरण बांधले जात आहे. या धरणाच्या महाराष्ट्र व आंध्र अशा दोन्ही राज्यांत गावपातळीवरील शेतकरी व रहिवाशांना किती गावे उठणार, पुनर्वसन प्रक्रिया कशी असेल, पाणी कुणाला व किती मिळणार, याविषयी कणभरही माहिती नाही. आंध्र सरकारने या प्रकल्पाच्या कालव्यांची 70 टक्‍के कामे पूर्ण केली आहेत. महाराष्ट्रातील 2 बारमाही नद्या पूर्णपणे वळवून कोरड्या करण्याची क्षमता असलेल्या या धरणाचा विरोध सुरू झाला आहे. 40 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्प किमतीपैकी 2 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. या धरणाबाबत महाराष्ट्र सरकार मौन बाळगून असून, विधानसभेतही जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी राज्यातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आमदार फडणवीस यांनी केला.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.