आरोग्य मंत्री
सुरेश शेट्टी यांनी घेतला रुग्णसेवेचा आढावा
चंद्रपूर
दि.29- जिल्हा सामान्य रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असून राज्यात
440 नवीन डॉक्टरांची भरती करण्यात आली आहे त्यापैकी प्राधान्याने चंद्रपूर
जिल्हयात पदस्थापना देण्यात येईल अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी
यांनी दिली. आज सामान्य रुग्णालयाचा पहाणी
दौरा करुन आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बल्लारपूर येथील ग्रामीण
रुग्णालय 30 खाटावरुन 50 खाटाचे करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावे अशा सूचना
जिल्हा शल्य चिकिस्तक यांना केल्या.
आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांचे सोबत आमदार
सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार, आरोग्य उपसंचालक डॉ.मनोहर पवार, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद सोनुने, माजी उपसंचालक डॉ.अरुण आमले, डॉ. टि.जी.धोटे,
डॉ.सरीता हजारे, डॉ.अनंता हजारे व डॉ.चंद्रशेखर लाडे दौ-यात सहभागी होते.
जिल्हा सामान्य
रुग्णालयात वर्ग 1 ची एकूण 14 पदे रिक्त असून त्यापैकी 9 पदे तात्काळ भरण्याची प्रक्रिया
करण्यात येईल असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
सिटी स्कॅन मशीन, एमआरआय मशिन व एक्स रे मशीन च्या निवीदा शासनाने
मागविल्या असून ही यंत्रसामुग्री लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी
सांगितले. या आढावा बैठकीत त्यांनी अंडवृध्दी
बाबत विशेष मोहिम घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम, माता
बालसंगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण, राष्ट्रीय एड्स नियंत्रण,
सिकलसेल नियंत्रण, मानसिक आरोग्य तपासणी, राष्ट्रीय कर्ण बधिरता नियंत्रण, हत्ती
रोग नियंत्रण, मधुमेह, कर्करोग नियंत्रण, शालेय आरोग्य तपासणी, क्षयरोग नियंत्रण व
कृष्ठ रोग नियंत्रण कार्यक्रमाचा सविस्तर आढावा आरोग्य मंत्र्यांनी घेतला.
बल्लारपूर येथे
30 खाटाचे रुग्णालय 50 खाटाचे करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आरोग्य
मंत्र्यांनी दिल्या. जननी सुरक्षा
कार्यक्रम अधिक प्रभावी पणे राबविण्याच्या सूचना देतांनाच गरोदर मातांना प्रसुती
संपूर्णपणे मोफत देण्यात याव्या असे
आरोग्य मंत्र्यांनी सांगीतले. चतुर्थश्रेणी रिक्त पदाबाबत जिल्हाधिकारी यांचेसोबत
बैठक घेवून ती भरण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश शेट्टी यांनी दिले.
या आढावा
बैठकीनंतर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची प्रत्यक्ष
पहाणी केली. यावेळी त्यांनी सामान्य कक्ष,
अतिदक्षता कक्ष, महिला प्रसुती कक्ष, बर्नवार्ड, ओपीडी, औषधी कक्ष यासह
रुग्णालयातील वार्डला भेट देवून पहाणी केली.
यानंतर मंत्रीमहोदयांनी
अधिका-यांशी व नागरीकांशी चर्चा करुन आरोग्य संबंधी समस्या सोडविण्यावर भर देणार
असल्याचे सांगितले.