आनंदवन प्रकल्पातील पल्लवी आणि कौस्तुभ आमटे यांना महाशिवरात्रीच्या दिवशी मुलगी
झाली. ती सध्या मुंबईत असून, गोंडस आणि सुंदर अशा पाहुणीच्या पहिल्या आगमनासाठी आनंदवन आतुर
झाले आहे.
बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन आणि अन्य प्रकल्पांत अनेक
सदस्य आहेत. बाबांनी पेटविलेली समाजसेवेची
ज्योत आजही त्याच ऊर्जेने पेटत आहे. बाबांच्या या समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ.
विकास आणि डॉ. प्रकाश यांनी समर्थपणे पेलली. त्यानंतर आमटे परिवारात आलेल्या सुना डॉ.
भारती आणि डॉ. मंदा यांनीही समाजसेवेसाठी जीवन समर्पित केले. तिसèया पिढीतील डॉ. शीतल, कौस्तुभ आणि अनिकेत हेसुद्धा
बाबांचे कार्य पुढे नेत आहेत. यातीलच कौस्तुभ आज आनंदवनाचे कार्य सांभाळत आहेत. या
परिवारासाठी महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला. कौस्तुभ यांची पत्नी पल्लवी
यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. १० मार्च रोजी सायंकाळी सात
वाजता मुंबई कांदिवली येथील नर्सिंग होममध्ये त्यांची प्रसूती झाली. ही बातमी क्षणात
कळताच आनंदवन परिसरात आनंदाची लाट उसळली.