यंदा अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले आताच कोरडे पडत चालले आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात केवळ २८.८६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चंद्रपूरकरांवर पाणी संकट अटळ आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांची तहान भागविणे मनपासमोर मोठे आव्हान आहे. याबाबत आता महानगरपालिका कोणती उपाययोजना करते, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
यंदा जोरदार पर्जन्यमान होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. मात्र हा अंदाज चुकीचा ठरला आहे. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने कोरडे गेले. जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस दिसलाच नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी आहे. मात्र पावसाने सरासरी गाठणे तर सोडाच सरासरीच्या निम्म्यावरही पाऊस पोहचला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पासह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूण जिल्ह्यावर यंदा भीषण पाणी टंचाईचे सावट घोंगावत आहे.
चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. या सर्व लोकांची तहान भागविण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे एकमेव इरई धरण हेच पाण्याचे स्रोत आहे. याच धरणातून पाण्याची उचल करीत चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे इरई धरणात मुबलक जलसाठा जमा होऊ शकला नाही. त्यामुळे धरणाची स्थिती आता हिवाळ्यातच चिंताजनक झाली आहे. या धरणात सध्या केवळ २८.८६ टक्केच पाणी आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे पाणी चंद्रपूरकरांना कसे पुरेल, हा प्रश्न आहे. याशिवाय पावसाचे आगमन जून, जुलै या महिन्यात होईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्यात चंद्रपुरात सूर्य आग ओकतो, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे इरई धरणातील पाणी या महिन्यात चंद्रपूरकरांना मिळणे कठीण दिसत आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागणार आहे.
वीज निर्मितीवरही संकट
पाण्यासोबत सध्या वीजही मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. दोन्ही घटकांची पावलोपावली गरज भासते. पाण्याशिवाय मानवाचे भागत नाही, हे खरे असले तरी आजकाल विजेशिवायही मनुष्याचे भागत नाही, हेदेखील नाकारता येत नाही. मात्र हे दोन्ही घटक सध्या संकटात सापडले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही वीज निर्मितीसाठी इरई धरणातूनच पाणी घ्यावे लागते. वीज केंद्र या धरणातून सातत्याने पाण्याचा उपसा करीत राहिले तर पाणी झपाट्याने कमी होईल. त्यामुळे वीज केंद्राने आपले काही संच बंद करून चंद्रपूरकरांसाठी पाणीसाठा आरक्षित ठेवावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे. मनपाचीही तशी इच्छा आहे. मात्र असे झाले तर उत्पादन कमी होऊन वीज टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
मनपाकडून एक दिवसाआड पाणी पुरवठा?
भविष्यातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेकडूनही पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. १ फेब्रुवारीपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहिती घेण्याकरिता महापौर अंजली घोटेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र संपर्क होऊ शकला नाही