गोंदिया : जिल्ह्यातील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव व बोंडगाव देवी या गावांचा दौरा करुन केंद्रीय पथकाने बाधित शेती व घरांची प्रत्यक्ष पाहणी केली व झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
या केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयातील दुग्धविकास, पशुसंवर्धन आणि मत्स्यविकास विभागाचे उपायुक्त आर.के. गुप्ता, भारतीय कृषी संशोधन मंडळाचे प्रधान संशोधक डॉ. आर.बी. सिंगनधुपे होते. त्यांच्या समवेत वखार महामंडळाचे सहायक व्यवस्थापक व्ही.जी. खोब्रागडे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे दौऱ्यात सहभागी होते.
या पथकाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे भेट दिली. डोंगरगाव येथील 25 हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. डोंगरगाव येथील शेतकरी श्री. खंडाईत यांच्या 5 एकरमधील टरबूज पिकाची, 2 एकरमधील गहू व 1 एकरमधील भाजीपाला व इतर पिकांची पाहणी पथकाने केली. बोंडगाव देवी येथील नुकसानग्रस्त शेतकरी कुसन झोळे यांच्या 5 एकरमधील टरबूज, 3 एकरमधील गहू व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पथकाने घेतली. तसेच अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाळकृष्ण मानकर, हरिभाऊ पर्वते, ऋषी बनकर यांच्या घरांची पाहणीही त्यांनी केली.
प्रत्यक्ष भेटीमध्ये पथकाने गारपिटीमुळे शेताची, घरांची व जनावरांच्या झालेल्या हानीबाबत संबंधितांशी चर्चा केली. यावेळी सहाय्यक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सहारे, अर्जुनी मोरगाव तहसिलदार संतोष महाले आदी उपस्थित होते.