पाच हजार नागरिकांनी केली नोंदणी
मनपा आणि क्रेडाई,नागपूर मार्फत आयोजित एक्स्पोचा समारोप
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर महानगरपालिका आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंतप्रधान आवास योजनेच्या एक्स्पोला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सुमारे २० हजार नागरिकांनी या एक्स्पोला भेट दिली. त्यातील पाच हजार पेक्षा जास्त नागरिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल योजनेसाठी नोंदणी केली. हा एक्स्पो २५ ते २७ जानेवारी या दरम्यान महापालिका मुख्यालय परिसर, सिव्हील लाईन्स येथे आयोजित करण्यात आला होता. या एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी (ता.२५) ला महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले.
या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेची नोंदणी केली नव्हती, अशा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या एक्स्पोमध्ये नोंदणी केली. नागरिकांना या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळू शकतात याचे मार्गदर्शन व माहिती या मेळाव्यातून देण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांची स्वःताच्या मालकीची जागा व कच्चे घर आहे, अशा नागरिकांना अडीच लाखाचे अनुदान घर बांधणीसाठी देण्यात येणार आहे. या योजनेच्या घटक क्रमांक ३ अंतर्गत जे नागरिक किरायाने राहतात किंवा त्यांच्याजवळ स्वःताचे घर नाही, त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांना नवीन घरं किंवा सदनिका खरेदी करायचा आहे, त्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जामध्ये रूपये २.६७ लक्ष पर्यंत अनुदान मिळणार आहे.या एक्स्पोमध्ये शहरातील नामांकित १९ डेव्हल्पर्स आणि सात बॅंकानी आपला स्टॉल लावलेला होता. नागरिकांना त्यांच्या बजेटमध्ये कुठे घरे उपलब्ध आहेत याची देखील माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच त्यांना त्यासाठी लागणाऱ्या कर्जाची माहिती एकाच छताखाली देण्यात आली. अनेक नागरिकांनी विकासकामांचे प्रकल्पांना समक्ष भेटी दिली. मुख्यत्वे या एक्स्पोमध्ये लघु उत्पन्न गट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांनी भेटी दिल्या.
या एक्स्पोच्या यशस्वीतेसाठी महापौर नंदा जिचकार व पदाधिकारी, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले. एक्स्पोमध्ये अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, कार्यकारी अभियंता राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरिश वासनिक, कनिष्ठ अभियंता मनोज रंगारी, उपअभियंता पंकज पाराशर, क्रेडाईचे अध्यक्ष अनिल नायर, सचिव गौरव अगरवाला यांनी परीश्रम घेतले.