वाशीम जिल्ह्यातून सार्वधिक अर्ज
भंडारा जिल्ह्यातून २०० अर्ज
नागपूर/प्रतिनिधी:
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सहभागी होण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज केले आहेत. आज दिनांक २८ जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील ७९ तर वर्धा जिल्ह्यातील ६७ शेतकऱ्यांसह राज्यातील ७,२०४ शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसात अर्ज केले आहेत. नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यात १,५७१ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६५६ अर्ज महावितरणकडे मागील दहा दिवसात करण्यात आले आहेत. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील १९३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मार्च- २०१९ पर्यन्त आपल्या शेतात सौर कृषी पंप लागावा यासाठी शेतकरी ऑनलाईन अर्ज करतो आहे किंवा महावितरणच्या जवळच्या कार्यालयात माहितीसाठी जातो आहे.
शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी, या उद्देशाने महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच शेतकरी बांधवाना या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेऊ शकतात.
या सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपारिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगकरिता ईलेक्ट्रीक सॉकेट बसवून देण्यात येणार असल्यामुळे शेतातील वस्तीमध्ये शेतकऱ्यांना राहण्याची सुविधा उपलब्ध होणार असून हिंस्त्र पशू, प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य होईल. अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली.