चंद्रपूर दि २३ जानेवारी : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय चंद्रपुर, जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा ग्रंथोत्सव 25 व 26 जानेवारी रोजी होत आहे. चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह मध्ये होणाऱ्या या ग्रंथ उत्सवाचे मुख्य आकर्षण गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा कार्यक्रम देखील आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी जनतेने आवश्यक, असे ग्रंथ खरेदी करता यावेत यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने ग्रंथप्रदर्शनी लागणार आहे. चंद्रपूर व जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी जनतेने या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 25 जानेवारीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या शुभहस्ते या ग्रंथप्रदर्शनातील ग्रंथदिंडीला सुरवात होणार आहे.
दुपारी ११ वाजता राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली, महापौर अंजलीताई घोटेकर यांच्याहस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी जीवनचरित्राचे अभ्यासक व विचारवंत अॅड. फिडेल बायदाणे उपस्थित राहणार आहेत.
२५ जानेवारीला दुपारी ११.३० वाजता वर्तमान परिस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी विचारधारेची प्रासंगिकता यावर अॅड. फिडेल बायदानी यांचे व्याख्यान आहे. दुपारी ३ वाजता कपिल जैन व संच यांचे हास्य कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या हास्य कविसंमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी आहेत.
सायंकाळी ७ वाजता गजलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम आहे.
२६ जानेवारीला ग्रंथजत्रा उद्घाटनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ता व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामार्फत ग्रंथ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या ग्रंथांची उपलब्धता या ठिकाणी राहणार असून सहाय्यक धर्मदाय आयुक्त व्ही.डी. भेंडे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. संस्था नोंदणी व कार्यकारी मंडळात बदल करणे, संस्था नोंदणी रद्द करणे आदी विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजाराम मोहनराय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकत्ताचे श्री. अनंत वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.
दुपारी २ वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे साहित्य आणि विचार यावर मुरलीमनोहर व्यास संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्राचार्य अनिल काटकर आहेत.
या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी जनतेने उपस्थित रहावे ,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रंथोत्सव समिती चंद्रपूर डॉ.कुणाल खेमनार, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लिकर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ महाराष्ट्र शासन अनिल बोरगमवार, प्रकाशक संघटना चंद्रपुर प्रतिनिधी श्री. परिमल धनकर, विदर्भ साहित्य संघ शाखा चंद्रपुरचे अध्यक्ष डॉ. शरदचंद्र सालफळे, जिल्हा ग्रंथपाल तथा सदस्य सचिव जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीचे श्री आर. जी. कोरे यांनी केले आहे.