चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेटजवळील पूल २०१० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेला होता. या पुलाची उंची वाढविण्यात यावी व पुलाचे बांधकाम मजूबत व्हावे यासाठी आमदार नाना श्यामकुळे यांनी ६ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीसाठी त्यांच्याकडून मागील दोन वर्षापासून सातत्याने होत असलेल्या प्रयत्नामुळे हिवाळी अधिवेशनात हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
चंद्रपूर मतदार संघातील ताडाळी, सोनेगाव, उसगाव, धानोरा पिपरी, मार्डा रस्ताच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ७९.८६ लाख, चंद्रपूर तालुक्यातील प्रजिमा ११ ला जोडणार्या घुग्घुस वळण रत्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी ७८.०२ लाख, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ताडाळी, सोनेगाव उसेगाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी ७४.७७ लाख, चंद्रपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळा व शौचालयाच्या नूतनीकरणासाठी ५०.४८, जिल्हा कारागृहाच्या भिंतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी १८.२८ लाख व मुख्य भितींच्या बांधकामासाठी ३९.०८ तर, चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ३ कोटी रुपये जिल्हा बजेटमधून प्राप्त झाले आहे. तसेच चंद्रपुरातील शासकीय अधिकारी यांच्या निवासासाठी २ कोटी रुपये मिळाले आहे.
झरपट नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे माना, नांदगाव या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू होईल, असे आमदार श्यामकुळे यांनी सांगितले. चंद्रपूर शहरातील महिलांच्या १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २६ कोटी निधी मार्च २०१२ मध्ये मंजूर झाला असून, या रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. तसेच वरोरा नाका उड्डाण पुलाचे काम २०१३ च्या अखेरपर्यंत संपवून हा उड्डाण पुल वाहतुकीस सूरू होणार असल्याचेही श्यामकुळे यांनी सांगितले आहे.