चंद्रपूर, गटसाधन केंद्र, पंचायत समिती सिंदेवाही मार्फत सर्व शिक्षा अभियान शालेय ग्रंथालय समृद्धीकरण योजना सन २०१२-१३ अंतर्गत सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय ग्रंथालय पुस्तके खरेदीकरिता निधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांत अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, पुरक वाचनातून ज्ञान समृद्ध करणे व जीवनात ग्रंथालयाचा उपयोग करणे हा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेंतर्गत शैक्षणिक सत्राकरिता तालुक्यातील निवडक ३२ जिल्हा परिषद लाभार्थी शाळांना शालेय ग्रंथालयाची पुस्तके खरेदी करण्यासाठी प्राथमिक शाळेला ३ हजार रुपये व उच्च प्राथमिक शाळेला १० हजार रुपये निधी शाळेच्या सर्व शिक्षा अभियानाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या रकमेतून लाभार्थी शाळांनी शासकीय व शासन मान्यता प्राप्त प्रकाशनाची ग्रंथालय पुस्तके शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन खरेदी करावयाची आहेत. या योजनेतून शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये लेखन वाचनाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालय पुस्तकावर आधारित लेखन वाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांना वस्तू रूपात प्रोत्साहनपर बक्षिसे वितरित करण्यात येणार आहेत. या ग्रंथालयाचा लाभ शाळेतील विद्यार्थी शिक्षकांबरोबरच गावातील वाचनप्रेमी व्यक्ती व पालकांनाही देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शाळांच्या यादीत जाटलापूर, लोनवाही, कारगाटा, गोविंदपूर, नवेगाव, लोनखैरी, मुरपार, सरडपार चक, कोंढा, मोहबोडी, कुकडहेटी, जामसाळा, नैनपूर, नाचनभट्टी, इंदिरानगर, पळसगाव जाट, भेंडाळा, खैरीचक व पवना चक आदी ३२ शाळांचा या योजनेत समावेश आहे.