- महावितरणचा भोंगळ कारभार
- सामान्य वीजग्राहकांना बसतोय फटका
कोहळी येथील रहिवासी असलेले नरेश कृष्णा टोंगे यांचे केवळ चार जणांचे कुटुंब अन् चार खोल्यांचे घर आहे़ घरी मोठ्या प्रमाणात वीज खपत होईल, अशा कोणत्याही विशेष वस्तूदेखील नाही़ मुळात मजुरी करणारे कुटुंब असल्यामुळे त्याची शक्यतादेखील नाहीच़ तरीही अशा सर्वसामान्य कुटुंबाला महावितरणने चक्क १ लाख ८७ हजार वीजबिल पाठविण्याचा प्रताप केला आहे़ वीजबिलाचा आकडा बघून टोंगे कुटुंबाला धक्काच बसला़ त्यांनी तत्काळ महावितरणच्या कार्यालयात कार्यालयात धाव घेतली़ चूक लक्षात आणून दिल्यानंतर सुधारित वीजबिल १ लाख ७ हजार ३० रुपयांचे देण्यात आले़ यातून कंपनीचा संवेदनशीलपणा दिसून आला़ इतके बिल भरणे शक्य नसल्याने त्यांनी पुन्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेतली असता, दुसºयांदा दिलेले सुधारित बिलदेखील चुकीचे असल्याचे लक्षात आले़ तेव्हा पुन्हा बिलात सुधारणा करून २० हजार ४६० रुपये सुधारित वीजबिल देण्यात आले़ परंतु, एका सामान्य कुटुंबाला इतके जास्त घरगुती वीजबिल भरणे शक्य नसल्याने टोंगे कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ २० हजार रुपये भरावेच लागणार, अशी सक्ती महावितरणकडून केली जात असल्याने टोंगे कुटुंबीय प्रचंड तणावात आहे़ वीजबिलात घोळ होण्याचे कारण विचारले असता, मीटर गेल्या चार वर्षांपासून फॉल्टी असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले़ तेव्हापासून ६७ युनिटचे वीजबिल पाठविण्यात येत होते़ नवीन मीटर लावल्यानंतर १०० युनिट वापरल्याचे दिसून आल्याने प्रत्येक बिलात ३३ युनिट आधी कमी पाठविल्यामुळे त्या ३३ युनिटचे वीजबिल आता एकाच वेळी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले़ मात्र, गेल्या चार वर्षांपासून मीटर फॉल्टी असल्याचे महावितरणला माहिती होते, तर ते बदलायला चार वर्षे का लागली? तत्काळ का बदलले नाही? असा प्रश्न केला जात असून महावितरणच्या चुकीचा फटका आम्ही का म्हणून सहन करायचा, असा सवाल टोंगे कुटुंबीयांनी केला आहे़
------------------------------
२० हजार रुपये भरावेच लागतील
गेल्या चार वर्षांपासून टोंगे यांच्याकडील मीटर फॉल्टी असल्याचे वीजबिलात दर्शविण्यात येत होते़ मात्र, मीटरचा तुटवडा असल्याने तत्काळ मीटर बदलता आले नाही़ तेव्हापासून त्यांना दर महिन्याला ६७ युनिटचे वीजबिल पाठविण्यात येत होेते़ आता नवीन मीटर लावल्यावर महिन्याला १०० युनिटचा वापर झाल्याचे लक्षात आले़ त्यामुळे आतापर्यंत ३३ युनिटचे वीजबिल कमी पाठविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले़ तेव्हापासूनच्या ३३ युनिटच्या वीजबिलाची बेरीज करून त्यांना २० हजार रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे़ त्यांना ते भरावेच लागतील़ लाखांवर आलेले बिल चुकीने पाठविण्यात आल्याचे साहाय्यक अभियंता लांबट यांनी सांगितले़