সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 12, 2017

चंद्रपूर जिल्ह्यातील 68 हजार 593 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

चंद्रपूर : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र 68 हजार 593 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. यामध्ये प्रोत्साहनपर योजनेतंर्गत 8 हजार 643 शेतकरी असून कर्जमाफी योजनेअंतर्गत 59 हजार 950 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करुन 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली होती. तसेच दीड लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच 2015-2016, 2016-2017 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. तसेच सन 2009-2010 ते 2015-2016 या कालावधीत कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असेल त्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते.

शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयकृत बँकाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी राज्य शासनाने पुरविलेल्या नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील 28 हजार 488 शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात देण्यात आली आहे. तर 24 हजार 766 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेमार्फत 5 हजार 615 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली असून 773 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली आहे. संबंधीत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे माहिती पाठवून शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ झालेले आहेत, असे शेतकरी पुढील वर्षी कर्ज घेण्यासाठी पात्र होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. पोटे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मार्डा येथील विनोद निळकंठ भोयर यांनी नियमीतपणे कर्ज भरले होते. राज्यशासनाच्या प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत ते लाभार्थी ठरले असून त्यांनी यासाठी राज्यशासनाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, ‘राज्य शासनाने कर्ज माफी करताना घेतलेला हा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय असून मला नियमित कर्ज भरून देखील प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे. यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा येथील संदीप सुधाकर निमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले,‘आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज फेडता आले नाही. मात्र शासनाने कर्ज माफी करून जगण्याला उभारी दिली आहे. शासनाचे आम्ही आभारी आहोत.’

चंद्रपूर शहराजवळील दाताळा येथील प्रकाश वासुदेव पारपल्लीवार कर्जमाफीमुळे खुश होते. ते म्हणाले, ‘सतत वाढत जाणाऱ्या कर्जामुळे कुटूंब व शेती सगळेच अडचणीत आले होते. राज्य शासनाच्या धोरणामुळे आम्हाला मदत झाली आहे. राज्य शासनाने गरिब शेतकऱ्यांसाठी हा चांगला निर्णय घेतलेला आहे.’

आरवट येथील मनोहर शंकर डवरे यांनी शासनाला धन्यवाद देताना सांगितले की, ‘80 हजार रूपयाचे कर्ज घेतले होते. व्याजासह 1 लाख 6 हजार कर्ज झाले होते. कर्ज कसे भरावे या विवंचनेत असताना हा निर्णय घेऊन सरकारने चिंता दूर केली आहे.’

चंद्रपूर तालुक्यातील शिवणीचोर येथील रमेश गोपाळा सूर यांचे 80 हजार कर्ज माफ झाल्याने ते आनंदी होते.ते म्हणाले, ‘बँकेचा एसएमएस आला कर्ज माफ झाल्याचं कळले. आमच्या कुटूंबाला आधार मिळाला आहे.’ याच गावचे पांडुरंग लटारी लोनगाडगे यांनी देखील सरकारच्या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.