शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक न्यायाची क्रांती शक्य -- पालकमंत्री संजय देवतळे
चंद्रपूर दि.26- शाहू फुले, आंबेडकर यांचा सामाजिक न्यायाचा वारसा चालविणारे महाराष्ट्र हे राज्य असून छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची क्रांती घडवून आणली त्यांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करत असून शिक्षणातूनच सामाजिक न्याय साधणे शक्य होणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री संजय देवतळे यांनी केले.
बचत साफल्य भवन येथे आयोजित सामाजिक न्याय दिन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मंगेश वानखेडे व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पेंदाम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला उत्तराखंड येथे मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना श्रदांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा विचार जनमाणसामध्ये रुजविण्याची गरज आहे. सामाजिक न्यायाच्या योजनांचा लाभ घेवून आपला विकास साधावा हीच खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.
उत्तराखंड येथे आलेल्या आपत्तीग्रस्तांना हातभार लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करण्यात येणार असून जिल्हयातील नागरीकांनी व स्वयंसेवी संस्थांनी पंतप्रधान सहायता निधीमध्ये आपले योगदान या कक्षात जमा करावे असे आवाहन देवतळे यांनी याप्रसंगी केले.
दलितमित्र डि.के.आरीकर व बी.व्ही.पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पालकमंत्री संजय देवतळे यांनी सत्कार केला. आंतरजातीय विवाह करणा-या दांपत्य, अपंग साहित्य वाटप, शैक्षणिक कर्ज वाटप, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती धनादेश तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री संजय देवतळे यांचे हस्ते करण्यात आला. संगीत क्षेत्रात जिल्हयाचा नावलौकिक करणा-या अनिरुध्द वनकर व ई शिष्यवृत्तीसाठी आयडीबीआय चे राहूल वानखेडे यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डहाळकर म्हणाले की, सामाजिक न्यायाच्या योजना राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून वंचित घटकाला न्याय देण्याचे काम या विभागाने केले आहे. डॉ.माधवी खोडे यांनी आपल्या भाषणात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करुन आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक न्यायाचा पाया भक्कम होत असल्याचे सांगितले. सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी जिल्हयातील विविध विकास योजनांचा आढावा प्रास्ताविकातून घेतला. कार्यक्रमाचे संचालन पाटील यांनी केले. या कार्यक्रमास समाज सेवक, नागरीक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.