मानव विकास मिशनचा उपक्रम
चंद्रपूर दि.20- नुकताच 10 वी व
12 वीचा निकाल लागला असून यात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी मानव विकास
कार्यक्रमांतर्गत मोफत शिकवणी वर्ग घेण्यात येणार असून या शिकवणी वर्गात प्रवेश
मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व मोठया गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा असे आवाहन मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत करण्यात
आले.
ज्या तालुक्याचा मानव विकास
निर्देशांक कमी आहे अशा तालुक्यातील मानवी जिवनांचा निर्देशांक उंचविण्यासाठी मानव
विकास कार्यक्रमांतर्गत राजूरा, जिवती, गोंडपिपरी, पोंभूर्णा, मूल, सावली,
सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपूरी, चिंमूर व वरोरा या तालुक्यात शिक्षण आरोग्य व
उत्पन्न वाढीच्या योजना राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हया ऐवजी तालुकास्तरावर
गट विकास अधिका-यांना अधिकार प्रदान केले आहेत.
या कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या
मोठया गावात अभ्यासिका सुरु करणे, ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी
पर्यंत शिक्षण घेता यावे याकरीता गाव ते शाळा एस.टी.बसची सुविधा पुरविणे, माध्यमिक
व उच्च माध्यमिक शाळेला प्रयोग साहित्य देणे, तालुक्याच्या ठिकाणी
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक आवड निर्माण करण्यासाठी विज्ञान केंद्र स्थापन
करणे, ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराकरीता व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देणे,
12 ते 18 वयोगटातील मुलींना आरोग्य विषयक समस्यांबाबत प्रशिक्षण देणे व दरडोई
उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करणे इत्यादी योजना या कार्यक्रमात राबविण्यात येणार
आहेत.
या योजनांचा
ग्रामीण भागातील विद्यार्थी, तरुण तरुणी व रोजगार करु इच्छिणा-या युवकांनी मोठया
प्रमाणात घ्यावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, जिल्हा परिषद मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.माधवी खोडे व जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यांनी
केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर अथवा जिल्हा नियोजन
अधिकारी नवीन प्रशासकीय इमारत चंद्रपूर येथे संपर्क साधावा.