मुंबईकरांचे जीवन सुखदायी करण्याची सुरुवात
- मुख्यमंत्री फडणवीस
एल्फिन्स्टन-परळसह, करी रोड, आंबिवली स्थानकावरील पादचारी पुलांचे लोकार्पण
लष्कराची विक्रमी वेळेत कामगिरी, मुंबईसाठी सुरक्षित-सुविधायुक्त रेल्वेसाठी प्रयत्न
- रेल्वेमंत्री
मुंबई, दि. २७ :- मुंबईकरासाठी उपनगरीय रेल्वे ही लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकराचे जीवन सुखदायी करण्याची सुरवात आज रेल्वे पादचारी पुलांच्या लोकार्पणातून सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मध्य रेल्वेच्या एल्फिन्स्टन-परळ, करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील पादचारी पुलांचे उद्घाटन तसेच लोकार्पण एल्फिन्स्टन-परळ दरम्यानच्या पादचारी पुलावर संपन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
· भारतीय लष्कराने या तीनही पुलांचे काम विक्रमी वेळेत पुर्ण केले आहे.
· एल्फिन्स्टन-परळ पुलाचे आणि अन्य दोन्ही पुलांचे उद्घाटन तसेच लोकार्पण मुंबईकरांचे प्रतिनिधी म्हणून मुंबईचे डब्बेवाले, कोळी बांधव अशा मूळ निवासी नागरिकांच्या हस्ते साधेपणाने करण्यात आले.
· यावेळी त्यांच्या हस्ते भारतीय लष्कराचे आभार मानणाऱ्या फलकांचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॅा. सुभाष भामरे, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते,खासदार अरविंद सावंत, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार कपिल पाटील, आमदार आशिष शेलार, आमदार नरेंद्र पवार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता, लष्कराचे अधिकारी कर्नल विश्वंभर, गौतम तनेजा, विनायक रामास्वामी आदींची उपस्थिती होती.
उद्घाटन व लोकार्पणानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस व रेल्वेमंत्री श्री. गोयल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपत्तीच्या काळात लष्कर मदतीसाठी धावते. पण अशा प्रकारच्या कामांसाठीही लष्कराने पुढे येऊन हे काम वेळेत पूर्ण केले आहे. भारतीय लष्कराने विक्रमी वेळेत या तीनही पुलांचे काम पूर्ण केले आहे. त्यांची ही कामगिरी महत्त्वपूर्ण अशीच आहे. पादचारी पुलांची अत्यावश्यकता ध्यानात घेऊन, लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो लष्कराने आपल्या कामगिरीने योग्य ठरविला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सुविधांसाठी रेल्वे मंत्रालयाने सर्वतोपरी सहकार्य देऊ केले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात चाळीस हजार कोटींची तरतूद केली आहे. तर यापूर्वीच अकरा हजार कोटी रुपयेही मिळाले आहेत. मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. त्यामुळे मुंबईकराचे जीवन गैरसोयमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात आज या लोकार्पणातून झाली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. गोयल म्हणाले, भारतीय लष्कराने ही तीनही पुल विक्रमी वेळेत पुर्ण केले आहेत. त्याचबरोबर रेल्वेच्या यंत्रणेनेही सतरा पुलांचे काम पूर्ण केले आहे. याशिवाय जून २०१८पर्यंत आणखी बावीस पूल पूर्ण होतील. तर आणखी ५६ पुलांच्या कामांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईकरांसाठी शंभरहून अधिक असे पादचारी पूल उपलब्ध होतील. एकूणच मुंबईसाठी एकावन्न हजार कोटींचा एकात्मिक विकास आराखडा रेल्वेने तयार केल्याचे श्री. गोयल यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव भारताचे स्वप्न पाहिले आहे, त्यामध्ये नव महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईतील रेल्वे सुविधांवर भर देऊन मुंबईकरांसाठी सुरक्षित व सुविधांनीयुक्त अशी रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असल्याचेही श्री. गोयल यांनी सांगितले