नवी दिल्ली:
मोबाईल नंबर हा 13 अंकी होणार असल्याच्या सध्या सोशल मीडियावर अफवा आहेत. मोबाईल नंबर 10 ऐवजी 13 अंकी असेल असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही माहिती तोडून-मोडून पसरवली जात आहे.दूरसंचार विभागाने 8 जानेवारी 2018 रोजी एक बैठक घेतली होती. ज्यामध्ये M2M म्हणजे मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबर लागू करण्यावर चर्चा झाली. M2M कम्युनिकेशन हा प्रकार व्यापाराशी संबंधित आहे. याचा आणि मोबाईल फोन नंबरचा काहीही संबंध नाही, अशी माहिती बीएसएनएलने दिली आहे.
M2M कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबर 1 जुलैपासून लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याचा मोबाईल नंबरवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व दूरसंचार कंपन्यांना सिस्टम M2M कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबरनुसार अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम ऑक्टोबर 2018 पासून सुरु होईल आणि अखेरची तारीख 13 डिसेंबर 2018 आहे. यासाठी LI (Lawful interception) सिस्टमही याच वेळेनुसार अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. Lawful interception च्या आधारावर तपास यंत्रणा गरज पडल्यास कोणताही संवाद ऐकू शकतात.
M2M कम्युनिकेशन म्हणजे काय?
M2M कम्युनिकेशनचा तुमच्या-आमच्या माबाईल वापराशी काहीही संबंध नसतो. ही एक व्यावसायिक सिस्टम आहे. व्यवसायासंबंधित कामकाजावर दूरुनच नियंत्रण ठेवण्यासाठी M2M कम्युनिकेशनचा वापर केला जातो. शिवाय इतर ठिकाणीही याचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ, रेल्वे स्टेशनवर तिकिटांसाठीची ऑटोमॅटिक मशीन असते, या मशीनमधील प्रिंटिंग पेपर संपला असेल तर M2M कम्युनिकेशनद्वारे तो पेपर टाकणाऱ्या व्यक्तीला सूचित केलं जातं. याशिवाय वेयर हाऊस मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल मॅनेजमेंट, रोबोटिक्स, ट्रॅफिक कंट्रोल, लॉजिस्टिक सर्व्हिस, सप्लाय चेन मॅनेजमेंटपासून ते टेलिमेडिसिनसारख्या सेवांसाठीही M2M कम्युनिकेशनचा वापर केला जातो.