नागपूर : उपराजधानीतील पत्रकाराची आई व मुलीचे अपहरण करून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली. अज्ञात आरोपीने दोघींचीही हत्या केल्यानंतर मृतदेह वेगवेगळ्या पोत्यात भरून बहादुरा परिसरातील संजुबा शाळेजवळील नाल्यात फेकून दिले. पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या साेमवारी सकाळी १२.३० वाजता दिघाेरी घाट येथे हाेणार आहे.
कांबळे कुटुंबीयांचे शेजारी राहणाऱ्या गणेश शाहू याने आपल्या कुटुंबीयांसह भिशीच्या पैशाच्या वादातून उषा कांबळे आणि राशी रविकांत कांबळे यांची हत्या केली. पोलिसांनी गणेश शाहूसह पत्नी आणि मुलालाही अटक केली आहे. दरम्यान, गणेश शाहू हा खून प्रकरणातील आरोपी असून त्याने शिक्षा भोगलेली आहे.
नागपूर येथे एका न्यूज पोर्टलच्या पत्रकाराची आई व दीड वर्षाच्या मुलीचा अपहरण करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे पत्रकारच नव्हे तर नागपूर हादरून गेले आहे. काल संध्याकाळपासून कांबळे यांची आई आणि मुलगी बेपत्ता होते. आज सकाळी दिघोरी नाक्याजवळ त्यांचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपूर टुडे या वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले.
रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. त्यनुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. याबाबत माहिती होताच नागपुरातील पत्रकार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. पत्रकारांवर हल्ले हे होत असतात. परंतु एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून झल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकार परिवाराचा सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आलाय.