चंद्रपूर/प्रतिनिधी:
श्री गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शीख बांधवांतर्फे शहरातील महाकाली मंदिर जवळील गुरुद्वारा खालसा कॉन्व्हेंट येथून हि शोभायात्रा काढण्यात आली. गुरुद्वारापासून निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वेश परिधान केलेली मुले घोड्यांवर स्वार झाली होती. तसेच तलवारबाजी, चक्री यासह विविध धाडसी खेळांचे दर्शन घडवत मानवता व विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे खेळ करण्यात आले. धार्मिक गीतांबरोबरच गुरूंच्या गादीचा या यात्रेत समावेश होता. शीख बांधव या गादीला प्रणाम करून प्रसादाचा लाभ घेत होते.
वाह गुरुनानक देव धनगुरु नानकदेव, सारा जग तारिया, कलितारण गुरुनानक आईया, बोले सो निहाल सत श्री अकाल, अशा घोषणांनी शोभायात्रेचा मार्ग दुमदुमून गेला होता. 12
वाजता अतिथींनी पालखीची पूजा केल्यानंतर शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत सुरुवातीला बँड पथक, आतशबाजी, पुष्पवृष्टी होत होती. लहान मुले शोभायात्रेत नाचत होते. पालखीच्या समोर भाविक मार्ग झाडून स्वच्छ करीत होते व त्यावर पाणी व दूध शिंपडले जात होते.
मार्गात ठिकठिकाणी चणे, बुंदी, मिठाई यांचे वितरण केले जात होते. मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दीप लावले होते, तसेच तोरण बांधण्यात आले होते.
हि शोभायात्रा गांधी चौक मार्गे जटपुरा गेट कडून शहराच्या मुख्य मार्गाने होऊन तुकूम येथील गुरुद्वारा मध्ये विसर्जित करण्यात आली. गुरुनानक जयंतीनिमित्त रविवारी सर्व शीख बांधवांनी उद्योग-व्यवसाय बंद ठेवले होते. गुरुद्वारात प्रार्थनेसाठी मोठी गर्दी झाली होती.
शोभायात्रेच्या प्रयोजनाबाबत सांगितले की, पंधराव्या शतकात स्वत:चाच धर्म श्रेष्ठ असल्याचा दावा समाजात होऊ लागला होता. जात-पात, स्पृश्यास्पृश्य, उच्च-नीच आणि गरीब-श्रीमंत यासारखे भेदभाव निर्माण झाले असतानाच गुरुनानकदेव अवतरित झाले. त्यांनी एकत्रितपणे नांदण्याचा, प्रेमाने राहण्याचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. तोच संदेश देण्याचा हेतू या शोभायात्रेचा आहे. या शोभायात्रेत हजारो शीख बांधव सहभागी झाले होते.