সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 02, 2017

रामटेक येथे राम मंदिरावर त्रिपुर पौर्णिमेनिमित्त केलेली आकर्षक रोषणाई

रामटेक
रामटेक- पर्यटन विकास व तीर्थस्थळांना उत्तम दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांत रामटेक या तीर्थस्थळाचा विसर पडतो की काय, असा प्रश्‍न रामटेकवासींना नेहमीच पडत असतो. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले विदर्भातील हे शहर अद्यापही विकासापासून दूर आहे.

प्रसिद्ध गडमंदिर, निसर्गरम्य परिसर, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे येथे वास्तव्य होते. जेथे प्रभू श्रीरामचंद्रांनी राक्षसांच्या निर्दालनाची प्रतिज्ञा केली ते स्थान. महाकवी कालिदासांचे जगप्रसिद्ध महाकाव्य "मेघदूत‘ची येथे रचना झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वामी सीतारामदास महाराजांसोबत केलेल्या तपश्‍चर्येचे ठिकाण, त्या रामटेकला एका "केअर टेकर‘ची अजूनही प्रतीक्षा आहे.

ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्त्व विभागाने पाठ फिरविल्याने परिसर भकास झाला आहे. अंबाळा येथे पिंडदानासाठी येणाऱ्यांनाही सोयीसुविधा नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कर्पूर बाहुलीचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे.

रामटेकची ओळख विदर्भाची अयोध्या, काशीचे महाद्वार, महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याचे स्थान, महाकवी कालिदासांच्या "मेघदूत‘चे रचनास्थान, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सीतारामदास महाराज, नारायणस्वामी महाराज यांच्या तपश्‍चर्येचे ठिकाण, जैन धर्मीयांचे तीर्थस्थान, पिंडदानासाठी पवित्र मानण्यात येणारे स्थान, 12 व्या शतकात राजा रामदेवराय या यादव नृपतीने निर्मिलेले राम-लक्ष्मण मंदिर, कर्पूर बाहुली विहीर, राष्ट्रकूटकालीन माता कालका मंदिर.

ऐतिहासिक ओळख विदर्भाची अयोध्या म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेला श्रीराममंदिर परिसर विकसित होण्याच्या मार्गावर असला तरी पर्यटकांना आकर्षित करण्यात असमर्थ ठरला आहे. यादव राजा रामदेवराय याने इ.स. 1200मध्ये या मंदिराची निर्मिती केल्याचे लक्ष्मणस्वामींच्या मंदिरातील शिलालेखावरून समजते. 800 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या या मंदिराचा सध्या विकास सुरू आहे. प्राचीन श्रीराम मंदिरात सुधारणा होत आहेत. 2001 मध्ये विदर्भ वैधानिक मंडळाने दीड कोटी रुपये खर्चून 37 हजार 500 चौरस मीटर परिसरात ओमची प्रतिकृती निर्माण केली. ओमच्या मध्यभागी लोटस पॉंड बनविण्यात आला. हा स्वयंचलित संगीत फवारा गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. या मंदिरात आधी पायपूजा होत असे. मात्र रघुजीराजे भोसले नागपूरकर यांना येथे केलेल्या याचनेनंतर भरपूर यश प्राप्त झाले. त्यावेळी त्यांनी मंदिरे एका भव्य किल्लेवजा परकोटात सुरक्षित केली. या परकोटाचे, ढासळणाऱ्या बुरजांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
रामटेकच्या विकासाच्या दिशेने राज्य सरकारची पावले मात्र अद्यापही वळलेली नाहीत. श्रीरामचंद्रांच्या पाऊलखुणा, ऐतिहासिक मंदिरे, निसर्गरम्य परिसर अशी एक ना अनेक वैशिष्ट्ये असलेल्या रामटेककडे केवळ राजकीय हेतूने दुर्लक्ष होत आहे. येथील गडमंदिर भंगले आहे. पायऱ्या खचू लागल्या आहेत. पायथ्याचे दगड कोसळू लागले आहेत. पाण्याची योग्य सोय नाही. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऊन-पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी विशेष व्यवस्था नाही.

रामटेकचा जलवारसा रामटेक हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. वाकाटकांनी, तसेच नागपूरकर भोसल्यांनी या परिसरावर राज्य केले होते. अनेक मंदिरे वाकाटकांच्या वास्तुकलेचे ऐश्‍वर्य दर्शवितात. त्याचप्रमाणे या शहराला तलावाचे सौंदर्यही लाभले आहे. रामटेक परिसरात लहान-मोठे दहा ते बारा तलाव आहेत. त्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे सर्वच तलाव एकमेकांशी जोडले असल्याचे काही संशोधकांनी सिद्ध केले आहे. शहरात अनेक पायविहिरी आहेत. त्यापैकी काही नामशेष झाल्या आहेत. तलावांचेही तसेच झाले आहे. त्यांचे स्रोत जपले न गेल्याने तेही शेवटच्या घटका मोजत आहेत. या स्रोतांचे बळकटीकरण करणे महत्त्वाचे आहे.

समस्यांची नगरी
पर्यटकांचे हाल ः ना पिण्याचे पाणी, ना स्वच्छतागृह, ना उन्हापासून बचावासाठी सावली. भक्‍तनिवास नाही. स्वच्छतागृहाअभावी भक्‍तांची विशेषतः महिलांची कुंचबणा होते.
दुकानदारांचे हाल ः फुले, नारळ, हार, प्रसाद व इतर वस्तू, चहा, फराळ आदी विक्रेत्यांची दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली पाडण्यात आली. त्यांना आधी दुकाने उपलब्ध करून मगच ही कारवाई अपेक्षित होती. मात्र आता ही दुकाने परत थाटण्यात आली आहेत. माकडांच्या उच्छादामुळे दुकानदारांना सुरक्षितता नाही. रात्री गडमंदिरावर अजिबात सुरक्षा नाही. पर्यटक राहात नसल्याने व्यावसायिकही नाहीत. स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उत्पन्नाचे साधन नाही.

काय हवे? भक्‍तनिवास, पिण्याचे पाणी व सुलभ शौचालय.
ओमचा संगीत फवारा सुरू व्हायला हवा.
अंबाळा येथे पिंडदानासाठी योग्य सोय; महिलांना कपडे बदलविण्यासाठी सुरक्षित व्यवस्था.
ठिकठिकाणी सूचना फलक.
बसस्थानकावर माहिती फलक.

अपेक्षित विकासकार्य गडमंदिराचे सुशोभीकरण
मंदिराचा आधार असलेल्या दगडांचे मजबुतीकरण
अंबाळाच्या दक्षिणेला आमगावजवळील आमराईनजीक शेगावच्या आनंद सागरप्रमाणे उद्यान असावे.
खिडसी ते शांतिनाथ मंदिर मिनीट्रेन.
गडमंदिरावर व्यावसायिकांसाठी दुकान गाळे.

रामटेक-खात रेल्वेमार्ग हवा रामटेक हे तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. नागपूरजवळ रामटेकपर्यंत रेल्वेमार्ग आहे. रामटेक शहरात येण्यासाठी, तसेच रामटेक-खात या 18 किलोमीटर अंतरासाठी रेल्वेमार्ग जोडावा. त्यामुळे रामटेक येथे पर्यटकांना येण्याच्या सुविधा उत्पन्न होतील. त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांना व्यापारी पेठ उपलब्ध होईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.