সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, September 07, 2012

हळद पिकाच्या व्यवस्थापनातून नफा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील प्रगतीशील शेतकरी सुधीर सातपुते यांनी हळद पिकाच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून भरघोस नफा मिळवला आहे. त्यांनी शेतीत हळदीच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक प्रयोग करून साडे चार एकर शेतीतून ५ लाखाचा नफा मिळवला आहे व या वर्षी साडे आठ एकरातून त्यांना किमान अकरा लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. सातपुते यांच्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना एक नवीन दिशा मिळाली आहे.
व्ही.ओ.१
हळदीचे पिक हे मसालावर्गीय पिकांमधील अतिशय लाभदायक पिक मानल्या जाते. मात्र या पिकाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावालागत असल्यामुळे व अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास शेतकरी या पिकापासून दूर जातात. चंद्रपूर जिल्हातील सुधीर सातपुते मात्र याला अपवाद ठरले आहे. गेल्या १४ वर्षांपासून ते हळदीची यशस्वी शेती करीत आहे व त्यांचा अनुभव हा शेतकऱ्यांसाठी हळदीच्या पिकासाठी मार्गदर्शक ठरलय. विशेष म्हणजे काही वर्षांआधी त्यांची हळदी पिकाची शेतीही डबघाईला आली होती. मात्र हळदी पिकाच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातून त्यांनी फक्त लाखोंच्या नफाच मिळवला नाही तर शेतीवर होणार्या खर्चावरही मोठी बचत केली आहे. साडे आठ एकर क्षेत्रात लावण्यात आलेल्या हळदी पिकासाठी त्यांनी साडे चार एकरात वायगाव या स्थानिक वाणाची निवड केली आहे तर चार एकरात सेलम वाणाच्या हळदीची लागवड करण्यात आली आहे. वायगाव हळदीला स्थानीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे त्यामुळे दलालांच्या मदतीशिवाय ते या हळदीची बाजारात थेट विक्री करतात. हळद लागवडीसाठी त्यांनी पारंपारिक पद्धतीने लागवड करण्यापेक्षा सरी-वरंभे पद्धतीचा वापर केला. त्यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा होवून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. गादी वाफे तयार करण्यासाठी सातपुते यांनी मजुरांची मदत घेण्याऐवजी ट्रक्टरच्या सहाय्याने गादी वाफे तयार केले, त्यामुळे सरी-वरंभे तयार करण्याचा प्रती एकरी येणारा १५ ते १६ हजाराचा खर्च ३.५ ते ४ हजारावर आला. या गादी वाफ्यांवर त्यांनी एक पुढे आणि दोन मागे या प्रमाणे ३ हळदीच्या बेन्यांची लागवड केली. लागवडी साठी त्यांनी त्यांच्या शेतातून मागच्या वर्षी तयार झालेले बेने वापरले त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली.
हळदीच्या पिकाला पारंपारिक पद्धतीने पाणी देण्यापेक्षा त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. पारंपारिक पद्धतीने पाणी दिल्यामुळे पाण्याचा आणि विजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय व्हायचा, तर तुषार ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यामुळे हळदीची पाने खराब व्हायची व याचा हळदीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम पडत होता. सातपुते यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यामुळे ते आता पाण्याची बचत करू शकले व शिल्लक राहिलेल्या पाण्यावर आता ते साडे बारा एकर शेतीत कापसाचे पिक घेत आहेत. ठिबक सिंचनामुळे साडे आठ एकर हळदीच्या पिकाला पाणी देण्यासाठी त्यांना फक्त एक ते दिढ तास पंप सुरु ठेवाव लागतो. ठिबक सिंचनामुळे रासायनिक खतांच्या मात्रेतही मोठी बचत झाली आहे. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून त्यांना हळद पिकाच्या प्रत्येक अवस्थेत खताचे व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. पिकांना युरिया, पोटाश व इतर खते एकाच वेळी दिल्याने त्याचा फायदा होत नाही. पिकांना वाढीच्या प्रत्येक अवस्थेत खतानची वेगळी आवश्यकता असते. त्यामुळे सातपुते यांनी पिकाच्या अवस्थेप्रमाणे ठिबक सिंचनातून ठराविक खते देण्यास सुरुवात केली. सध्या ते पिकांना एक दिवसाआड २ किलो युरिया, एक किलो स्पुरद व आठवड्यातून एकदा १२:६१:०० देतात. पिकांना खतांची किती मात्र देण्यात आली आहे याचा त्यांनी काटेकोर हिशोब ठेवला आहे. खतांच्या या व्यवस्थापनातून खर्चात तर बचत झालीच पण जमिनीत खतांचा अतिरिक्त निचरा न झाल्यामुळे जमिनीची सुपिकताही टिकून राहिली.
खतांवर त्यांना प्रती एकरी ४ हजार याप्रमाणे जवळ जवळ ३५ हजार खर्च झाला तर मजुरी वर २ लाख, बुरशी नाशकावर १६ हजार, ठिबक सिंचनावर सरासरी ५० हजार व इतर खर्च ४५ हजार येणार आहे. असा सर्व खर्च विचारात घेसल्यास त्यांना ४ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. या हळदीच्या पिका पासून त्यांना मागच्या वर्षी जवळ जवळ ८ लाखाचे उत्पन्न मिळाले व यावर्षी किमान ११ लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. यावर्षी त्यांना १५०-१६० क्विनटल वाळलेली सेलम हळद व १०० क्विनटल वाळलेली वायगाव हळद होण्याची अपेक्षा आहे. वायगाव हळदीला किमान ८ हजार रुपये व सेलम ला ६ हजार क्विनटल भाव मिळाला तरी त्यांना १६ लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. सर्व खर्च वजा केल्यास त्यांना प्रती एकरातून दिढ लाख नफा मिळू शकतो. विशेष म्हणजे सुधीर सातपुते यांनी कच्च्या हळदीवर प्रक्रिया करून त्यातून येणारी तुट कमी करण्यासाठी पण यशस्वी प्रयत्न केलाय. पाण्यात हळद उकळल्याने एक क्विनटल हळदीचा उतारा १४ ते १५ किलो यायचा व त्याचा रंग बिगडल्यास किंमतही कमी मिळायची. सुधीर सातपुते यांनी हळद उकळण्या ऐवजी वाफवण्याचा प्रयोग केला व त्यामुळे हळदीचा उतारा प्रती क्वीनटल २० किलो पर्यंत मिळाला व संपूर्ण हळकुंडाला एक सारखा रंग आल्यामुळे किंमतही चांगली मिळाली. हळदीच्या पिकात त्यांनी धण्याचे अंतरपिक घेवून एक लाखाचा कोथिंबीर बाजारात विकला आहे. विशेष म्हणजे कोथिंबीर लागवडीसाठी त्यांना बियाणे व मजुरी याव्यतिरिक्त कुठलाही खर्च करावा लागला नाही त्यामुळे हळदीच्या शेतीत धण्याचे आंतरपीक खूप फायद्याचे ठरते असा त्यांचा निष्कर्ष आहे. पारंपारिक पिकांना फाटा देवून नवीन पिकांकडे वळताना मोठा धोका पत्करल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये असते व या मध्ये नुकसान आल्यास ते लवकर निराश होतात. मात्र नगदी पिकांचे व्यवस्थापन कश्या प्रकारे करावे हे जर नीटपणे समजून घेतले तर ही पिकं नक्कीच भरघोस नफा मिळवून देणारी ठरू शकतात.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.