देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 16, 2012 AT 03:30 AM (IST)
Tags: k. s. sudarshan, jubili highschool,
चंद्रपूर - वयाच्या अवघ्या नवव्या वर्षांपासून संघ परिवाराशी जुळलेले आणि पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे के. एस. सुदर्शन यांनी आपले माध्यमिक शिक्षण येथील ज्युबिली हायस्कूल येथून घेतले. त्यावेळी ते मॅट्रिकमध्ये मेरिट लिस्टमध्ये पहिले आले होते. हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती.
के. एस. सुदर्शन यांचे रायपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने शहरासह जिल्ह्यातील संघ परिवार आणि मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. मूळचे रायपूर येथील के. एस. सुदर्शन यांचा जन्म 18 जून 1931 मध्ये झाला. त्यांचे वडील सीतारामय्या सुदर्शन हे तत्कालीन मध्य प्रदेश शासनाच्या वनविभागात सेवारत होते. त्यांची बदली चंद्रपुरात झाली. तेव्हा हा परिसर मध्य प्रांतात होता. 1945 ते 47 च्या काळात के. सुदर्शन यांनी आपले माध्यमिक शिक्षण येथील ज्युबिली हायस्कूलमध्ये घेतले. यापूर्वी त्यांनी दमोह, मंडला, रायपूर आदी ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेतले होते. कुशाग्र बुद्धीचे सुदर्शन सर्व विद्यार्थ्यांत अव्वल असायचे. मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्तायादीत येण्याचा मान मिळविला होता. येथील माध्यमिक शिक्षणानंतर ते जबलपूर येथे अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी गेले. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत सहभाग घेतला. एका आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. 1964 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी पहिल्यांदा धुरा सांभाळली. अल्पवयातच त्यांनी मध्य भारतातील प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी स्वीकारली. 1969 मध्ये अखिल भारतीय संघटनेत संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आले. संघकार्याला वाहून घेतलेल्या सुदर्शन यांनी तब्बल 45 वर्षे संघ प्रचारक म्हणून काम केले. 2000 मध्ये सरसंघचालकपदी निवड झाली. ज्युबिली हायस्कूलचा माजी विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचा प्रमुख झाल्याचा आनंद आजही ही शाळा व्यक्त करते.
ज्युबिलीने घडविले विद्यार्थी ज्युबिली हायस्कूलची स्थापना इंग्रजांनी 1906 मध्ये केली होती. सुरुवातीच्या काळात येथे कारकुनांना प्रशिक्षण दिले जायचे. मात्र, समाज संघटनांनी येथे शाळा सुरू करण्याची मागणी केल्यानंतर ज्युबिलीचे रूपांतर शैक्षणिक संस्थेत झाले.
ज्युबिली हायस्कूलमधून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी देशात विविध क्षेत्रांत मोठ्या पदावर गेले. माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार, बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे, गोळवलकर गुरुजी, के. सुदर्शन, क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची यादी या शाळेने ठळकपणे लावली आहे. सुदर्शन हे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे ते बालपणातील वरिष्ठ वर्गमित्र होते. सुदर्शन यांचे लहान बंधू श्री. पोटदुखेंच्या वर्गात शिकायचे. सुदर्शन यांना तीन भाऊ व एक बहीण होती. त्यांनीही प्राथमिक शिक्षण येथेच घेतले. ज्युबिली हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या निधनाबद्दल विद्यमान प्राचार्य उद्धव डांगे यांनी विद्यालयाने घडविलेला हीरा हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

kavyashilp.blogspot.in