সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 19, 2011

प्राणायामाने दिला जगण्याचा "योग'

देवनाथ गंडाटे

चंद्रपूर - कुणाच्या शरीरावर गाठ होती, कुणी पोटाच्या आजाराने त्रस्त झालेले. कुणाला झोपेतच बेशुद्ध पडण्याचा आजार, तर काही जन्मत: मूकबधिर, तर कुणी कर्करोगाने पीडित. हे सारेच विकार आता दूर झालेत. प्राणायामाने दिलेल्या जगण्याच्या "योगा'चे अनुभवकथन करीत रोगमुक्त झालेले स्वामी रामदेवबाबा महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
बुधवारी पहाटे ठीक पाचला येथील वनराजिक महाविद्यालयाच्या प्रांगणात योगगुरू स्वामी रामदेवबाबा महाराज यांच्या योग शिबिराला सुरवात झाली. साडेसातपर्यंत चाललेल्या शिबिरात स्वामी रामदेव महाराजांनी योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह सांगितले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने योगाचे धडे गिरवित प्राणायाम केले. यानंतर स्वामी रामदेव महाराजांनी योगामुळे ज्यांना फायदे झाले, अशांना समोर बोलाविले. यावेळी अनेक व्याधींनी त्रस्त वृद्ध, तरुण आणि महिला समोर आल्या. किटाळी येथील मधुकर ताजणे यांच्या कानाजवळ मोठी गाठ होती. डॉक्‍टरांकडून उपचार घेऊनही गाठ गेली नाही. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनात दररोज योग सुरू केल्याने गाठ कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

रितेश पेचे हा पाच वर्षांचा मुलगा जन्मत: बहिरा आणि मूकबधिर होता. रुग्णालयात दाखविण्यात आले. मात्र, उपचार शक्‍य नसल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दूरचित्रवाणीवरून योगाचा कार्यक्रम पाहून प्राणायाम केले. आता रितेश बोलू लागला असून, त्याला ऐकूसुद्धा येत आहे. यावेळी त्याची आई स्वामींची भेट घेऊन नतमस्तक झाली.
बल्लारपूर येथील चहाविक्रेते विठ्ठल (वय 60) यांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग झाला होता. डॉक्‍टरांनी एक लाख रुपयांचा खर्च सांगितला. इतके पैसे कुठून आणणार? मग दररोज सकाळी प्राणायाम सुरू केले. आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. जेवणसुद्धा नीट होते. हे सर्व योगामुळे झाल्याचे विठ्ठलराव मोठ्या आनंदाने सांगत होते. राजकुमारी यादव यांच्या मेंदूला अपघातामुळे आघात झाला होता. योगामुळे आता त्या बऱ्या झाल्यात. गायत्रीदेवी यांना चार वर्षांपूर्वी पोटाचा आजार होता. रुग्णालयात बराच पैसा खर्च करूनही आजार बरा झाला नाही. डॉक्‍टरांनी मृत्यूची तारीखदेखील सांगितली. "प्राणासाठी यम' जवळ असताना योग करण्याची कल्पना सुचली आणि डॉक्‍टरांनी दिलेली मृत्यूची तारीख टळल्याचे गायत्रीदेवी म्हणाल्या. काशिनाथ क्षीरसागर (घुग्घुस) यांच्या पोटातील कर्करोग, तर प्रभाकर चहारे यांचा हत्तीरोग योगामुळे बरा झाला. सिंदेवाही येथील गणेश राठोड यांचे शरीर आणि वजन अवाढव्य वाढले होते. त्यांना रात्री झोपेत बेशुद्ध पडण्याचा आजार जडला होता. योग सुरू केल्यापासून या सर्व व्याधी बऱ्या झाल्या आहेत. योगामुळे जीवनदान मिळाल्याने गणेशने "बाबा, तुमच्यामुळेच वाचलो' असे जोरात सांगत बाबांच्या चरणी माथा टेकला.

क्षणचित्रे
- कार्यक्रमस्थळी मोफत आयुर्वेद तपासणी आणि औषधवितरण
- नांदाफाटा येथील श्री. गुरुदेव राष्ट्रसंत प्रचार समितीच्या 120 शिबिरार्थ्यांनी स्फूर्तिगान सादर केले.
- भारत स्वाभिमान यात्रेनिमित्त स्वामी रामदेव महाराजांनी प्रियदर्शिनी सभागृहात स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
- जनजागरण सभा आणि शिबिराला सहकार्य करणाऱ्यांना महाराजांनी माळ भेट देऊन स्वागत केले.
- नियमित योग करणाऱ्या आणि व्याधीमुक्त साधकांना पतंजली योगपीठाचे उत्पादन भेट.
- लहूजीनगर येथील तुषार ढोणे (वय 17) याने बाबांना योगाची विविध आसने करून दाखविली.



रामदेवबाबा म्हणाले...
पाच वर्षांनंतर चंद्रपुरात आलोय. येथील नागरिकांत तोच जोश आणि तीच श्रद्धा कायम आहे. लाचप्रकरणात सापडलेले डॉ. रमेश बांडेबुचे जर दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन, वाईट सवयी, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सत्याग्रह केला जाईल.

भद्रावतीत 15 मिनिटे

चंद्रपूर येथून चिमूरकडे प्रस्थान करताना सायंकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी महामार्गावर उपस्थित 500 च्या आसपास नागरिक रामदेवबाबांच्या दर्शनासाठी थांबून होते. यावेळी रामदेवबाबांनी थांबून योग, प्राणायाम, भ्रष्टाचार, काळा पैसा यावर मार्गदर्शन केले. यावेळी भारत स्वाभिमान, पतंजली योगचे अनंता मत्ते, सुनील वैद्य, दादाजी मोरे, कोंगरे यांची उपस्थिती होती.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.