शेतकऱ्याच्या जीवनाची "कांजी'
देवनाथ गंडाटे
चंद्रपूर - काहीतरी जगावेगळे करण्याचा ध्यास बाळगलेल्या चंद्रपुरातील काही युवकांनी चित्रपट निर्मितीची चाकोरीबाहेरची वाट निवडली. ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या या चित्रपटात शेतकऱ्यांच्या जीवनाची होणारी होरपळ "कांजी' या लघुपटाच्या माध्यमातून दाखविली आहे. यात 24 कलावंत असून, ते सर्व वैदर्भीय आहेत. दिवसरात्र एक करून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती सुरू केली असून, हा लघुपट त्यांना "कान्स' महोत्सवात सादर करायचा आहे.
निप्पो प्रॉडक्शनने साकारलेल्या या लघुपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ चंद्रपूर शहरापासून जवळच असलेल्या जुनोना येथून करण्यात आला. येथील एका घरात सरपंचाचा वाडा दाखविण्यासाठी सेट तयार करण्यात आला. गावातील एका शेतकऱ्याच्या बैलावर सरपंचाची नजर असते आणि हा बैल मिळवण्यासाठी तो शेतकऱ्याचे जीवन कसे बरबाद करतो, हा या चित्रपटाचा मुख्य गाभा आहे.
पश्चिम महाराष्ट्रात बेवारस गुरांना जिथे ठेवतात, त्याला "कोंडवाडा' म्हटले जाते. तर, याच कोंडवाड्याला विदर्भात "कांजी' असे संबोधतात. या शब्दातच विदर्भ दडला आहे. दुसरे म्हणजे "कांजी' हा शब्द शेतकऱ्यांशी जुळलेला आहे. या कांजीमुळेच एका शेतकऱ्याला त्याचे जीवन कसे संपवावे लागते, याचे भयाण चित्रण या लघुपटातून दिसते.
विदर्भ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजत असताना त्याच पार्श्वभूमीवर या युवकांनी हा गंभीर विषय निवडावा, यातच त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्ष पटते. या चित्रपटात जिवंतपणा यावा, यासाठी ही सारी युवा मंडळी झटत आहे.
चंद्रपूर जिल्हा हा झाडीपट्टी रंगभूमीसाठी प्रसिद्ध आहे. सिनेसृष्टीतील अनेक मोठे कलावंत इथल्या रंगभूमीवर अवतरले. मात्र, इथे कधी चित्रपट निर्मिती झालेली नाही. त्याची कुणी हिंमतही केली नाही. सूरज खोब्रागडे या युवकाने मुंबईत बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला खरा; पण कुणीही गॉडफादर नसल्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांपुरता तो मर्यादित राहिला. आता त्याला काहीतरी वेगळे करून दाखवायचे आहे. त्यासाठी त्याची ही धडपड आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट पाच लाख रुपयांचे असल्याने मोठी अडचण निर्माण झाली. मात्र, नितीन पोहाणे यांनी निर्माता म्हणून धुरा सांभाळली. हा लघुपट वैदर्भीय युवकांसाठी मोठी उपलब्धी असल्याचे चित्रपटातील सरपंचाची भूमिका रंगवणारे सुनील देशपांडे यांनी सांगितले.
या चित्रपटाचे निर्माते नितीन पोहाणे असून, दिग्दर्शन सूरज खोब्रागडे यांनी केले आहे. छायांकन योगेश सोनकुसरे, ध्वनियंत्रणा के. राजू यांची असून, कलावंतांमध्ये सुनील देशपांडे, रवींद्र धकाते, गौरव पराते, शौर्य, अभय अमृतकर, अभिषेक उराडे, प्रणाली शेंडे, केतकी देशपांडे, गौतम भडके यांच्यासह अन्य 24 कलावंतांचा सहभाग आहे.

सिंक साउंडचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच केला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या यावर प्रकाशझोत टाकणारा हा विषय आहे. शेतकऱ्यांची व्यथा आणि दशा या लघुचित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
- सूरज मधुकर खोब्रागडे, दिग्दर्शक