चंद्रपूर - नवजात बालकांना पळविण्याच्या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन अनोळखी व्यक्ती आले. ते वॉर्ड क्रमांक 10 मध्ये जाऊन संशयास्पदरीत्या फिरत होते. जवळ कुणीही नसल्याचे पाहून त्यांनी हालचाली सुरू केल्या. मात्र, कक्षात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने वेळेच भान राखून पोलिसांना बोलाविले. यावेळी बालक पळविण्याचा प्रयत्न फसल्याने ते दोघेही पसार झाले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी एका बालकाला पळविल्याची घटना घडली होती. या घटनेने पुन्हा एकदा रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कक्षाच्या मार्गावर प्रसूतीपूर्व कक्ष, नवजात बालक आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी वॉर्ड क्र. नऊ, दहा आणि अकरामध्ये व्यवस्था आहे. प्रसूतीनंतरच नवजात बालके तेथे असतात. तिथे महिला परिचारिका आणि एक सुरक्षा कर्मचारी तैनात असतो. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात आले.
त्यांनी प्रसूतिगृहातील बालकांच्या कक्षेत प्रवेश केला. ज्या बालकाजवळ कुणीही नव्हते, त्या बेडजवळ जाऊन पळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. ते संशयास्पदरीत्या कुजबूज करताना परिचारिकेच्या लक्षात आले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी कक्षातील दूरध्वनी उचलला. मात्र, तो बंद होता. त्यामुळे तिने चौकी गाठून पोलिसांना बोलाविले. पोलिस येत नाही तोच ते पसार झाले होते. बालकांची चौकशी करण्यात आली. त्यात सर्व बालके सुरक्षित होती. पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारातही चौकशी सुरू केली. मात्र, ते दोघे पळून गेले होते.
सीसीटीव्ही कॅमेरे "शोपीस'
गत दोन वर्षांपूर्वी घडलेल्या बालकचोरीच्या घटनेनंतर हुशार झालेल्या रुग्णालयाने चोरट्यांना पकडण्याच्या दृष्टीने प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, या कॅमेऱ्यातून चित्रीकरणच होत नसल्याची माहिती प्रत्यक्षभेटीतून दिसून आली.