সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, August 04, 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना मिळणार भरीव निधी:अहिर

गावाला पायाभूत सुविधांसाठी निधी : सरपंच करणार नियोजन
चंद्रपूर /प्रतिनिधी:
 जिल्ह्यातील पंधराशेच्यावर गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्ह्यातील सरपंचांच्या भरगच्च मेळाव्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी आज केले. 
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात आज झालेल्या जिल्हाभरातील सरपंचांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत गावागावांना मिळणाऱ्या निधीबाबतची माहिती उपस्थित सरपंचांना दिली. लक्षावधीचा निधी थेट ग्रामपंचायतला मिळणार आहे. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरपंच उपस्थित होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आ.म.यादव, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जिवतोडे, वरोरा पंचायत समिती सभापती रोहिणी देवतळे, भद्रावतीच्या सभापती विद्या कांबळे, पोंभूर्णाच्या सभापती अल्का आत्राम, गोंडपिपरीचे सभापती दिपक सातपूते, जिल्हा परिषद सदस्य प्रविण सुर, राजू गायकवाड, मारोती गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सरपंचांनी आपल्या गावाच्या समस्या मांडल्या. याशिवाय काही प्रलंबित विषयावरही यावेळी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. 
केंद्र शासनाने देशातील सर्व राज्यांमधील खनिज विकास प्रतिष्ठान मार्फत क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी ही योजना आखली आहे. ही योजना बाधीत क्षेत्रातील (खाणीमुळे बाधीत झालेली गावे) सामाजिक विकास व मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोकसंख्या व बाधित क्षेत्र, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबवताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थिती वरील आघात कमी करणे, क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घमुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, यासाठी या निधीचा वापर करण्याचे दिशा निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर हा सर्वाधिक खनिज बाधित जिल्हा आहे. त्यामुळे सर्वात जास्त निधी या योजनेअंतर्गत चंद्रपूरला मिळाला आहे.
यासंदर्भात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी या योजनेत प्रत्येक गावाला लक्षावधी रुपये मिळणार असल्याचे स्पष्ट केले. या रुपयांचा विनियोग योग्य कामांसाठी झाला पाहिजे, असे आवाहन उपस्थित सरपंचांना केले. यावेळी त्यांनी खर्च करण्यासाठी सर्वाधिक प्राथमिकता त्या गावातील शुद्ध पेयजलासाठी प्रत्येक गावाने स्वतःच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था निर्माण करताना एटीएम आरो मशीन लावावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय सर्व बाधित गावाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा शुद्ध पेयजल पुरवणाऱ्या आरो मशीनचे एटीएम लावण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. गावांमध्ये शाळा, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सोलर यंत्राद्वारे शाश्वत वीजपुरवठा यालाही प्राधान्य देण्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक गावाच्या शेजारील नाल्याला खोलीकरण करण्यासाठीही या निधीचा खर्च करण्यात यावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रत्येक सरपंचाने ग्रामस्थांना गावाच्या विकासाचा कृती आराखडा सादर करावा व यामध्ये प्राथमिकता पेयजल व शाश्वत ऊर्जा स्त्रोत निर्माण करण्याला देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत कुठले काम घेतले जाऊ शकते. याबाबतचे सादरीकरण जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.जी.डी.कांमडे यांनी केले. यावेळी सरपंचांनी केंदीय गृहराज्य मंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.