खापरखेडा/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात नेतृत्व विकास कार्यक्रमा अंतर्गत “३६० डिग्री संवाद व मल्टी टास्किंग (बहुकामे)” या विषयावर मध्य भारतातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका तसेच प्रेरणादायी प्रशिक्षक श्वेता शेलगावकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. महानिर्मितीच्या खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्रामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात “३६० डिग्री संवाद” तर दुसऱ्या सत्रात मल्टी टास्किंग (बहुकामे)” या उपयुक्त विषयांवर त्यांनी प्रभावी सादरीकरण केले. याप्रसंगी खापरखेडा वीज केंद्राचे उप मुख्य अभियंते मनोहर खांडेकर, राजेंद्र राउत आणि प्रशिक्षक श्वेता शेल्गावकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
३६० डिग्री संवादाविषयी श्वेता शेलगावकर म्हणाल्या कि, सुप्त कलागुण प्रत्येकामध्ये आहेत त्याचा योग्य वापर करून यशाचा मार्ग निवडायला हवा. अनेक व्यक्ती तर दुसऱ्याने आपल्या शक्ती स्थानांची /प्रतिभेची ओळख करून दिल्यानंतर प्रयत्न करायला सुरुवात करतात. नेतृत्व विकासात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आहे. योग्य संवाद नसल्याने वारंवार समस्या निर्माण होतात. कामकाजाच्या ठिकाणी, दिवसभर सोबत असणाऱ्यांना आपण किती ओळखतो ? औद्योगिक सुरक्षिततेसोबतच भावनिक-मानसिक व भौतिक सुरक्षा देखील तितकीच महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभावी संवादासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे. सांस्कृतिक मूल्यांचा संवादावर उत्तम प्रभाव पडतो. आज माहितीचे विश्व खुले झाल्याने नवनवीन ज्ञान, शिकण्याची उर्मी/वृत्ती जागृत ठेवून, विचारांची स्पष्टता असायला हवी. बोलण्यात स्पष्टता नसल्यास, पाहिजे तसा प्रभाव पाडता येत नाही. विशेष म्हणजे, वागणुकीतून निर्णय क्षमता दिसून यायला हवी. संवादासाठी श्रवण कौशल्य चांगले ठेवल्यास बुद्धी आणि हृद्यावर त्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. भाषेच्या गोडव्यातून संवादात आपुलकी वाढते, संवाद मोकळा असायला हवा. शब्द आणि शारीरिक हालचाल वचनबद्ध असायला हवी. आभासी दुनियेत जास्त रममाण होण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनाचा आंनंद घेतल्यास तणावरहित जीवन जगता येईल. एकूणच संवादात आदर, सभ्यपणा, स्पष्टता, समयसूचकता, सकारात्मकता असायला हवी असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या युगात कामाचा भार सातत्याने वाढतच आहे. कोर्पोरेट क्षेत्रात कमी मनुष्यबळाकडून जास्तीत जास्त कामे करून घ्यायची संकल्पना रूढ झाली असल्याने प्रत्येकाला मल्टी-टास्किंग (बहुकामे) करावी लागतात. मल्टी-टास्किंग करिता शरीर आणि मन सुदृढ ठेवणे गरजेचे आहे. विविध कामांचे नियोजन करताना रोजच्या कामाची यादी तयार करून प्राधान्यक्रम ठरवा, छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कामाची विभागणी करा, आळस झटका, बुद्धी आणि शरीराचा आंतरिक आवाज ऐका, समाज माध्यमांच्या मोजका वापर करा, सांघिक भावना जोपासून इतरांच्या योग्यतेवर विश्वास टाका, योग्य वेळी विश्रांती घ्या व विशेषत: सराव, निरीक्षण व अनुसरण करा असे श्वेता शेलगावकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन स्नेहा लालमुंडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय अढाऊ यांनी केले.
खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाला अधीक्षक अभियंते विलास मोटघरे, बंडावार, जितेंद्र टेंभरे, अर्जुन वानखेडे, कार्यकारी अभियंते, विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.