সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, February 22, 2015

सांबनेरचे झाले सावनेर

वाकाटककालीन
सांबनेरचे झाले सावनेर

वाकाटक राजानंतर रामदेव, पुढे राष्ट्रकुट व नंतर मालवाधिपतींच्या अधिपत्याखाली त्या युगांचे चढ-उतार जवळून पाहण्याचे भाग्य सावनेर नगरीला लाभले. चौदाव्या शतकात येथे व परिसरात गवळ्यांची वसाहत असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. निळगाव-बोरगाव परिसरात पुरातत्त्व खात्याला उत्खननात सापडलेल्या अवशेषांमुळे याला पुष्टी मिळाली आहे. गवळ्यांचे दैवत "सांब'. त्यावरून या वस्तीचे नाव "सांबनेर' पडले. कालांतराने त्याचे सावनेर झाले.

ऐतिहासिक पार्श्‍वभूमी
गवळी राजानंतर येथे गोंड राजाचा अंमल सुरू झाला. देवगड ही मध्य प्रांताची राजधानी होती. येथील आटबा या पराक्रमी राजाने नगरीत किल्ला बांधला. त्याचा नातू बख्त बुलंदशाहने इ.स. 1702 मध्ये देवगडहून राजधानी नागपूरला आणण्याच्या दृष्टीने नागपूर वसविले. त्याचा वंशज चांद सुलतानने इ. स. 1706 मध्ये नागपूरला राजधानी आणली. त्यावेळी त्याची एक फलटण सावनेरला स्थायिक झाली. कोलार नदीच्या पैलतीरी ब्राह्मण, राजपूत, लोधी, क्षत्रिय, बैरागी, छिपा क्षत्रिय, बुंदेलखंड भाषी, कुणबी, गोस्वामी इत्यादी मराठी भाषक लोक स्थायिक झाले.
...
संतांच्या पदस्पर्शाने पावन
सावनेर नगरीला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. संत सीताराम महाराज, धरमदास बाबा, कडकडी महाराज, बाबा ताजुद्दीन, शफी बाबा, जामदार बाबा आदी येथे वास्तव्यास होते. त्याचप्रमाणे गाडगेबाबा, मेहेरबाबा, विनोबा भावे, तुकडोजी महाराज, शंकराचार्य, आचार्य तुलसी आदींचा चरणस्पर्श या नगरीला झाला. लाल सेनेचे संचालक बाबा बुधोलिया हे होते.
...
1910 मध्ये धावली रेल्वे
इ.स. 1910 मध्ये सावनेर येथे पहिली रेल्वेगाडी धावली. यामध्ये कै. राघोबादादा पलिया यांचा सिंहाचा वाटा होता. सावनेर नगरपालिकेचे पहिले सेक्रेटरी विठ्ठलराव महाकाळ झाले. त्यावेळी मध्य प्रदेश कायदा सी. पी. ऍण्ड बेरार म्युनिसिपल ऍक्‍टनुसार चालायचा. सावनेर महाराष्ट्रात आले, तेव्हा महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्‍टनुसार कारभार सुरू झाला. त्यावेळी पहिले नगराध्यक्ष बालाप्रसाद बुधोलिया झाले.

.... फोटो / सावनेर गडकरी
राम गणेश गडकरींचे वास्तव्य
इ.स. 1918 च्या काळात प्रसिद्ध नाटककार कै. राम गणेश गडकरी वयाच्या 33 व्या वर्षी सावनेर येथील त्यांच्या भावाच्या घरी राहण्यास आले. पुढे "गोविंदाग्रज' या टोपण नावाने त्यांनी बरेच लेखन केले. 26 मे 1885 रोजी गुजरात राज्यातील नवसारी येथे जन्मलेल्या गडकरींचा 23 जानेवारी 1919 ला सावनेरमध्ये मृत्यू झाला. ज्या ठिकाणी त्यांना मुखाग्नी देण्यात आला तो भाग आज कै. राम गणेश गडकरी स्मशानभूमी नावाने ओळखला जातो.
पुरातत्त्व विभागाने गांधी चौकातील त्यांचे घर ताब्यात घेऊन पर्यटकांसाठी खुले केले आहे. कळमेश्‍वर रोडवरील चौकाला गडकरी चौक असे नाव दिले. गडकरींच्या नावाने येथे नाट्यगृह आहे. त्याची देखरेख सावनेर तहसील कार्यालयामार्फत केली जाते. पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी नगरपालिकेने त्यांची समाधी बनविली आहे.


काय हवे
शैक्षणिक शासकीय महाविद्यालय
सोयी-सुविधांनी युक्‍त रुग्णालय
ट्रॅफिक सिग्नल
पार्किंग व्यवस्था
उद्यान
वसतिगृह
....
काय नको
बेरोजगारी
मांसविक्रीची दुकाने
दारूची दुकाने
...
दृष्टिक्षेपात सावनेर
लोकसंख्या : 35 हजार, वॉर्ड, 20, नगरसेवक 20, राष्ट्रीयीकृत बॅंका 6, सहकारी बॅंका 3, पतसंस्था 10, न. प. शाळा 5, महाविद्यालये 4, न. प. शाळा 5, महाविद्यालये 4, न. प. कर्मचारी 72, पं. स. कर्मचारी 38, तहसील कार्यालय कर्मचारी 36, तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र 1, सार्वजनिक वाचनालय 1, बचतगट (ग्रामीण) 545, शासकीय गोदाम 1, नाट्यगृह 1, चित्रपटगृह 1, विधी न्यायालय 3(2 सुरू), क्रीडा संकुल 1
....
फोटो / सावनेर मार्केट
अतिक्रमणांमुळे वाहतूक प्रभावित
सावनेर बसस्थानक ते बाजार चौकादरम्यान मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी फळ, भाजी, कपडे याशिवाय इतर साहित्यांची दुकाने आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या बाजारामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होतो. फुटपाथ व्यावसायिकांना स्थायी जागा देऊन ही समस्या कायमस्वरूपी सोडविता येऊ शकते. परंतु, प्रशासन यासाठी पुढाकार घेत नसल्याची ओरड व्यापारी तसेच नागरिकांची आहे.
...
बाजारात स्वच्छतागृहाचा अभाव
लगतच्या गावांसाठी सावनेरची बाजारपेठ मुख्य आहे. त्यामुळे विविध कामांसाठी नागरिकांची बाजारात ये-जा असते. जुना भाजीबाजार परिसर वगळता होळी चौक ते बसस्टॅण्डपर्यंत कुठेही पिण्याचे पाणी तसेच शौचालयाची सोय नाही. त्यामुळे व्यापारी, बाजारासाठी येणारे नागरिक तसेच महिलांची अडचण होते. परंतु पालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.
...
फोटो / सावनेर होम
घरकुल योजना अपूर्ण
दारिद्य्ररेषेखालील कुटुंबीयांसाठी शासनाद्वारे घरकुल योजना राबविण्यात आली. परंतु नगर परिषदेने घरकुलांसाठी नदीच्या काठावर जागा निवडल्याने अनेकांनी घरे नाकारली. आज बरीच घरे अर्धवट स्थितीत असल्याने ज्यांनी पैसे भरले त्यांना अद्याप घर मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी नागरिकांनी केली आहे.
....
फोटो / सावनेर पूल
नादुरुस्त पुलामुळे आवागमनास त्रास
कला-वाणिज्य महाविद्यालयानजीक असलेल्या कोलार नदीवरील पूल नादुरुस्त आहे. या ठिकाणी अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
....
जनावरांचा हैदोस
मुख्य रस्त्याच्या कडेला बाजार भरत असल्यामुळे मुख्य बाजार ते बसस्थानक परिसरात जनावरांचा हैदोस असतो. मोकाट जनावरांमुळे या ठिकाणी अपघात नित्याचे झाले आहेत. याबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळविले, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
....
डांबरी रस्ते, नाल्यांचा अभाव
येथील महाजन ले-आउट व भगत ले-आउटमध्ये अद्याप डांबरी रस्ते नाहीत. याशिवाय नाल्या नसल्यामुळे सांडपाणी मोकळ्या प्लॉटमध्ये साचून राहते. ज्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून, साथरोगांची भीती बळावली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत परिसरातील नागरिकांना घरातून बाहेर निघणे कठीण होते. पालिकेकडून नियमित करवसुली केली जाते. परंतु नागरिकांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
.....
भूमिगत गटार योजना रखडली
कॉंग्रेस व नगरविकास आघाडी यांच्या आपसी राजकीय संघर्षामुळे मागील 10 वर्षांपासून भूमिगत गटार योजना रखडली आहे. विद्यमान आमदार सुनील केदार यांनी ही योजना पुन्हा राबविण्याचे ठरविले आहे; परंतु त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
....
फोटो / सावनेर हॉस्पिटल

आरोग्य केंद्रात सोयी-सुविधांचा अभाव
सावनेरमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे; परंतु सर्व सुविधांनी युक्‍त शासकीय रुग्णालय नाही. एखादा अपघात घडल्यास रुग्णाला नागपूरला हलविण्याशिवाय पर्याय राहत नाही. आमदार सुनील केदार चौथ्यांदा निवडून आले. परंतु, त्यांनी आरोग्य सुविधेबाबत ठोस पावले उचलली नाहीत. किमान प्रशिक्षण केंद्रात आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
....
दारूचा महापूर
सावनेरमध्ये बिअरबार व देशी दारूविक्रीची 22 च्या वर दुकाने आहेत. विशेष म्हणजे दुकानांमध्ये गर्दी असते. त्यामुळे तरुण मुले व्यसनाधीन होत असून, गुंडप्रवृत्ती वाढत आहे. दारू, जुगार, सट्टा, गांजा, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
....
उद्यानाअभावी चिमुकल्यांचा हिरमोड
सावनेरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी येथे ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी तसेच बालकांना खेळण्यासाठी हक्‍काचे ठिकाण नाही. मागील वर्षी आमदार सुनील केदार यांनी शिवाजी चौकाजवळील नगर परिषदेच्या जागेवर राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व व्यायामशाळा उघडणार असल्याचे जाहीर केले होते. न. प. मध्ये याबाबत ठराव घेण्यात आला. मात्र अद्याप काम सुरू झालेले नाही.
....
ंमांसविक्रीची दुकाने गावाबाहेर असावी
येथील जुना धान्यगंज परिसरात मच्छी तसेच मांसविक्रीची दुकाने आहेत. लगतच दारूचे दुकान असल्यामुळे दिवसभर दारुड्यांचा येथे अड्डा असतो. याच ठिकाणी देवीचे मंदिर आहे. त्यामुळे देवळात येणाऱ्यांना दारुड्यांची शिवीगाळ ऐकत मंदिरात प्रवेश करावा लागतो. दुकानाच्या सभोवताल वस्ती आहे. महिला तसेच लहान मुलांना येथून ये-जा करावी लागते. त्यामुळे ही दुकाने गावाबाहेर हलवावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...
शैक्षणिक प्रगती नाही
सावनेरमध्ये अकरावी, बारावीसोबत कला, वाणिज्य, विज्ञानाची पदवीपर्यंतची शैक्षणिक सोय उपलब्ध आहे; परंतु इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, बीई, एमबीएसारखे अनेक कोर्स असलेले महाविद्यालय नसल्याने शैक्षणिकदृष्ट्या सावनेर अद्याप मागासलेलेच आहे.
...
फोटो / सावनेर वीज

उघड्या डीपीकडे दुर्लक्ष
येथील अनेक घरांवरून अतिउच्च दाबाच्या वीजतारा गेल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी उघड्या डीपी आहेत. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. लेखी निवेदन देण्यात आले; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही.
....
अस्वच्छ नदीपात्र
येथील कोलार नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदी परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. याशिवाय जलपर्णीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच नदीच्या पाण्याचा वाघोडा, बोरुजवाडा, मालेगाव व मानेगाववासींना पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नदीस्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.
....
समाजभवन नाल्यावर
सावनेर नगरपरिषदेद्वारे कोलार नदीच्या काठावर घरकुल व शेजारच्या नाल्यावर समाजभवनाची निर्मिती केली आहे. समाजभवनाची निर्मिती कुणासाठी आणि का करण्यात आली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अर्धवट स्थितीत असलेल्या घरकुलात गांजा, जुगार खेळणाऱ्यांची सदैव रेलचेल असते.
...
स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण रखडले
नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पालिकेने अतिशय घाईत येथील राम गणेश गडकरी स्मशानभूमीचे बांधकाम केले; परंतु बरीच कामे अर्धवट स्थितीत आहेत. लोखंडी अँगलवर प्लास्टिकच्या टिनाचे शेड अद्याप टाकलेले नाही.
....
पाण्याच्या टाकीची आवश्‍यकता
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची सुविधा अतिशय तोकडी आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहरातील काही वॉर्डांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे शहरात पाण्याची टाकी असणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी आपसी वैरत्व विसरून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.
.....
यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने : 9823268322
आमदार सुनील केदार : 9422108360
नगराध्यक्षा वंदना धोटे : 9850208744
ठाणेदार शैलेश सपकाळ : 8975601531
मुख्याधिकारी मिलिंद साठवणे : 7350076933
उपविभागीय अधिकारी विनोद हरकंडे : 9423117240
....
प्रतिक्रिया

सावनेरच्या मुख्य मार्गालगत भाजीपाला विक्रेते बसतात. त्यामुळे रहदारीस त्रास होतो. या व्यावसायिकांना इतर ठिकाणी स्थानांतरित करून स्थायी जागा देण्यात येईल. शहराची हद्द वाढत असून, नाल्यांची व्यवस्था केली जाईल. नगर परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करू.
- वंदनाताई धोटे, नगराध्यक्ष

तरुणांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी पालिका प्रशासनाकडे कोणताही कार्यक्रम नाही. क्रीडासंकुल अर्धवट स्थितीत आहे. विज्ञान केंद्र नाही, व्यायाम शाळा नाही, उच्च दर्जाचे वाचनालय नाही. जनता वारंवार त्याच त्या लोकप्रतिनिधींना कशी निवडून कशी देते, हा प्रश्‍न पडतो.
- रमेश वानखेडे
...
शहरात ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसाठी हक्‍काचे ठिकाण नाही. सर्वसामान्यांकडून वारंवार उद्यानाची मागणी केली जाते; परंतु पालिका प्रशासन केवळ आश्‍वासनांवर त्यांची बोळवण करते. स्थानिक पुढारी प्रभावहीन असल्याने आज सावनेरची दुर्दशा झाली आहे.
- दिनेश इंगोले
....
तालुक्‍याच्या दर्जानुसार शिक्षणव्यवस्था असणे गरजेचे होते. परंतु येथे इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, एमबीए महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नागपूर गाठावे लागते. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या प्रगती होणे गरजेचे आहे.
- रूपेश भिंगारे
...
शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस जटिल रूप धारण करीत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या टाक्‍या कुचकामी ठरत आहेत. आता महात्मा फुलेनगर व पहिलेपार येथे पाण्याची टाकी अतिशय गरजेची आहे. उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने त्वरित टाकी बांधणे गरजेचे आहे.
- गजेंद्र कोमुजवार

दिवसेंदिवस कोलार नदीपात्रात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. नगरपालिका प्रशासनाने नदीपात्र त्वरित स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करावा.
- मनीष घोडे
...
बाजार ओळीत स्वच्छतागृहांचा अभाव आहे. त्यामुळे व्यापारी तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. स्वच्छतागृहाअभावी महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
-नरेंद्र पारवे
...
घरकुल योजना अपूर्ण असल्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पैसे भरूनही घर मिळत नसेल तर योजना काय कामाची, असा प्रश्‍न लाभार्थ्यांनी विचारला आहे. अधिकारी, पुढाऱ्यांनी यावर तातडीने उपाययोजना करावी.
- विक्रम गमे
.....
गडकरी चौकापासून कळमेश्‍वरकडे जाणाऱ्या मार्गावरील कोलार नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. या ठिकाणी अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरित पुलाची डागडुजी व्हावी.
- पुरुषोत्तम काळे
...
मुख्य बाजार चौकात मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो. यामुळे अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही. पोलिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
-प्रदीप ढोले
...
शहरातील अनेक रस्त्यांवर डांबरीकरण नाही. नाल्या नसल्यामुळे डासांचा हैदोस वाढला आहे. पालिका प्रशासनाकडून आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष आहे.
-राहुल घटे
...
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालय नाही. शहरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालय होणे गरजेचे आहे.
- स्वाती आष्टणकर 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.