चंद्रपूर - चंद्रपूरभूषण पुरस्काराने जो गौरव होत आहे, तो वैयक्तिक नाही. आनंदवनच्या कार्यासाठीचा हा पुरस्कार आहे. बाबांच्या चळवळीचा आपण "ठेकेदार' आहे. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम करीत आहे, असे उद्गार डॉ. विकास आमटे यांनी काढले.
लोकाग्रणी स्व. ऍड. बळवंत राघव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकाग्रणी स्मृती प्रतिष्ठानतर्फे स्नेहांकितच्या व्यासपीठावरून दिला जाणारा यंदाचा नववा "चंद्रपूरभूषण' पुरस्कार आनंदवन व महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांना रविवारी (ता. एक) सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. यावेळी मंचावर प्राचार्य झाकिर शेख, प्राचार्य मदन धनकर, ऍड. चंद्रकांत देशमुख यांची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते डॉ. विकास आमटे यांना सन्मानपत्र, शाल-श्रीफळ आणि 11 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शहरातील काही नागरिकांनी आनंदवन संस्थेला मदत म्हणून एक लाख 20 हजारांचा निधी जाहीर केला. सन्मानपत्राचे वाचन प्राचार्य मदन धनकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत देशमुख यांनी केले. संचालन राजाभाऊ बोझावार यांनी केले. यावेळी सभागृहात माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रव्यापी लोकशक्ती अभियान राबवू : मेधा पाटकर
देशातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने जनलोकपालला मंजुरी दिलेली नाही. लोकपाल कायदा अमलात आणण्यासाठी सर्वांत मोठी लढाई सुरू असतानाही शासन झुकलेले नाही. आता राष्ट्रव्यापी लोकशक्ती अभियान राबवू, अशी घोषणा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.