সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, January 11, 2012

वैद्यकीय महाविद्यालयाने वाढविला राजकीय ज्वर

Tags: medical college, politics, chandrapur, vidarbha

चंद्रपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरला व्हावे, यासाठी येत्या 12 जानेवारीला माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शहरात मानवी साखळी तयार करण्यात येणार आहे; मात्र या साखळीतील "कडी' जुळविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच यावर आरोप-प्रत्यारोपांचे घाव घालणे सुरू झाले आहे. भाजप-सेनेनंतर आता राष्ट्रवादीनेही कॉंग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष या दोघांनीही स्वतंत्रपणे पक्षाची बाजू मांडली आहे. एकाचा सूर थेट आरोपाचा आहे, तर दुसऱ्याने मात्र मध्यम मार्ग निवडला आहे.



खासदार असताना काय केले?
महाराष्ट्रात चार नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. यापूर्वी चंद्रपूरचे वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे पळवून नेल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादींच्या नेत्यांवर केला होता; परंतु आता त्याच वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यावर सातारा येथे मंजूर झालेले महाविद्यालय हे चंद्रपूरचेच असल्याची दिशाभूल करणे सुरू केले आहे. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री यांनी शक्ती खर्ची घातली. त्यामुळे ओरड करायची असेल तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध करा, असा सल्ला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी माजी खासदार पुगलिया यांना दिला आहे. पुगलिया दोन वेळा आमदार, एक वेळा राज्यसभेत आणि लोकसभेत खासदार होते. तेव्हा त्यांनी महाविद्यालय का आणले नाही? असेही वैद्य यांनी म्हटले आहे. स्वत:चे अपयश लपविण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करीत आहेत. जिल्ह्यातील उद्योगांच्या माध्यमातून अद्ययावत चॅरिटेबल हॉस्पिटल उभारता आले असते. भाजप आणि कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी या उद्योगांना जाणीवपूर्वक आर्थिक भुर्दंडापासून दूर ठेवले आहे. राजकारणातील सततच्या अपयशामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांना वैफल्य आले आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत. वरोरा नाक्‍यावरील दोषपूर्ण रेल्वे उड्डाणपुलामुळे चंद्रपूर शहरातील निष्पाप 50 नागरिकांचा, तरुण, तरुणींचा अपघातात बळी गेला. हे दोषपूर्ण बांधकाम विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या दबावाखाली झाले. त्यातील दोष दूर करून या पुलाची विस्तारित डिझाईन तयार करून लवकरच बांधकाम सुरू होणार आहे. शहराच्या विकासात भर घालणाऱ्या तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वरोरा नाक्‍यावरील या पुलाला कॉंग्रेस पक्षाने विरोध करणे म्हणजे विकासात अडथळे आणण्याचा हा प्रकार आहे, असा आरोपही वैद्य यांनी केला आहे.



मुद्दा चांगला; मानसिकता नकारात्मक
माजी खासदार पुगलिया यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन झाले. या आंदोलनात काही चांगले मुद्दे मांडण्यात आले. या मुद्द्यांचे स्वागत झाले पाहिजे; परंतु काही अवास्तविक व नकारात्मक मानसिकतेचेही मुद्दे यात होते, असा सूर राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी पत्रपरिषदेत लावला. वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पुगलिया यांनीच केली होती; मात्र आपल्या जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व यात कमी पडले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वच नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादीचा कुठल्याही विकासकामात अडथळा नसतो. राज्य शासनाचे निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनाने होत असतील, तर पडद्यामागचे मुख्यमंत्री पवार आहेत, असा यातून समज निर्माण करता येईल. पवार निर्णय घेत असतील, तर मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांच्याकडे महाविद्यालयाचा रेटा लावला पाहिजे, असे दत्तात्रेय म्हणाले. जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वत:चा कमकुवतपणा लपविण्यासाठी राज्याच्या कार्यक्षम नेत्यांवर चिखलफेक करू नये, असा सल्लाही दत्तात्रेय यांनी दिला. वरोरा नाका चौकातील पुलाचेही त्यांनी समर्थन केले. यामुळे जैन स्तंभाला कुठलीही बाधा पोचणार नाही. दीक्षाभूमीच्या अस्तित्वालाही बाधा पोचणार नाही. या पुलाचे स्वागत करून बायपास निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.



नेते तुमचेच आहेत
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पश्‍चिम महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. त्यांनी नेहमीच विदर्भातील विकासाचा निधी पळविला आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा त्यांनी आपल्या क्षेत्रात नेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांवर आरोप करण्यापेक्षा आपल्याच नेत्यांकडे महाविद्यालयासाठी गळ घालावी.


- विनायक बांगडे, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी



गोंडवाना शासकीय वैद्यकीय विद्यापीठ व्हावे, यासाठी विधानसभेत मी ठराव मांडला होता. यासाठी आजवर सहा पत्रेही दिली आहेत. शासनाकडून उत्तरही मिळाले आहे. त्यात चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी संस्थेने, व्यक्तीने वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी केली, तर त्यावर विचार करता येईल, असे मात्र उत्तरात कळविले आहे.


- आमदार नाना श्‍यामकुळे, चंद्रपूर


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.