चंद्रपूर - फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या 85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळी गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. चारही परकोट आणि महत्त्वपूर्ण वास्तूंच्या प्रतिकृती साकारण्यात येतील.
येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होत असून, मुख्य संमेलनस्थळाला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी' असे नाव देण्यात येणार आहे. शहराच्या रचनेनुसार प्रवेशाच्या ठिकाणी चार दिशांना चार प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राहणार असून, अन्य प्रवेशद्वारांना लोकनेते दादासाहेब देवतळे, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हापरिषदेचे पहिले अध्यक्ष तथा माजी खासदार अब्दुल शफी यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपास महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री लोकनेते मा. सा. ऊर्फ दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात येणार असून, मंडपाच्या दोन्ही द्वारांना दिवंगत राज्यमंत्री वामनराव गड्डमवार व दिवंगत आमदार नामदेवराव पोरेड्डीवार, तर दुसऱ्या सभामंडपास श्रीमती लताबेन छोटूभाई पटेल यांचे नाव देण्यात येणार आहे.
मुख्य सभामंडपाच्या व्यासपीठास 1857 नंतर गोंडवनातील स्वातंत्र्यसमराचे अग्रणी वीर बाबूराव शेडमाके यांचे नाव देण्यात येणार आहे. 1979 साली चंद्रपुरात संपन्न झालेल्या 53 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास वीर बाबूराव शेडमाके यांचेच नाव देण्यात आले होते, हे विशेष!
संमेलनात ग्रंथप्रदर्शन प्रमुख आकर्षण असून, त्याला दिवंगत कवयित्री श्रीमती कमलादेवी दीक्षित यांचे नाव देण्यात येणार आहे. पत्रकार दालनास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष विद्यावाचस्पती राम शेवाळकर यांचे नाव, भोजन दालनास दिवंगत नगराध्यक्ष राजमलजी पुगलिया यांचे नाव, कवी कट्ट्यास दिवंगत राज्यमंत्री यशोधरा बजाज यांचे, तर प्रकाशन कट्ट्यास दिवंगत राजे विश्वेश्वरराव महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.