पुर्वीचे चांदा. महाराष्ट्र्राचा चंद्रपूर जिल्हयाचे प्रमूख ठिकाण. हे एराई व झरपट नद्यांच्या संगमाजवळ, वर्धा-काझीपेठ लोहमार्गावरील वध्र्यापासून ११८ किमी. आग्नेयीस आहे. दिल्ली-मद्रास लोहमार्गही चंद्रपूरवरून जातो तसेच उत्तम सडकांनी हे नागपूर, गडचिरोली, वरोडा व इतर महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. शहरात तेल गिरणी, काच कारखाना असून कापूस पिंजणे, रेशमी आणि सूती विणकाम, रंगकाम, विटा, कौले, बांबूकाम, कातडीकाम, सोन्याचांदीचे दागिने बनविणे इ. उद्योग आहेत. चंद्रपूर परिसरात कोळसा, लोखंड, बेरियम सल्फेट, चिनीमाती इ. खनिजे मिळतात. तसेच जंगलाचे प्रमाणही मोठे असल्याने त्यावर अवलंबून असणार्या उद्यांेगांना चंद्रपूर हेच मध्यवर्ती ठिकाण पडते. १९७५ साली येथूनच पाच किमी अंतरावर एक पोलाद कारखाना निघाला आहे.ताडोबा राष्ट्रीय उद्यानचंद्रपूरपासून ४५ किमी. उत्तरेस आहे. प्राचीन भद्रावती (भांडक) ही वाकाटकांची व त्यानंतर गोंडांची राजधानी चंद्रपूरजवळच होती. त्यामूळे चंद्रपूरज्वळ किल्ला, तट तसेच अंकलेश्वर, महाकाली, मुरलीधर इ. मदिर व इतर अवशेष आढळतात.
चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर, अंचलेश्वर आणि गोंड राजांचे समाधिस्थळ ही प्रसिद्ध स्थळे. एक अप्रसिद्ध परंतु अतिशय सुंदर शिल्पकलेने नटलेले लहानसे शिवमंदिर बाजाराजवळ एका गल्लीत आहे. ह्याशिवाय चंद्रपुरातील एक प्रसिद्ध परंतु आवर्जून बघण्यासारखे स्थळ म्हणजे रायप्पा कोमटी ह्यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधकाम सुरू केलेले पण अपूर्ण राहिलेले मंदिरस्थळ. येथे महाकाय मूर्ती ऊन्ह, धूळ आणि पावसाचा मारा सहन करीत उघड्यावर पडून आहेत. जवळपास तीस फूट उंचीच्या नवमुखी दुर्गेच्या मूर्तीला रावण समजून दसर्याच्या दिवशी लोक दगड मारीत. त्यामुळे मूर्तीला क्षती पोचली आहे. ह्याशिवाय महाकाय आकारच्या गणपती, वराह, मत्स्य आणि इतर मूर्ती तिथे आहेत.