भद्रावती (जि. चंद्रपूर) - जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील प्राचीन जैन मंदिरात पार्श्वनाथाच्या मूर्तीवरील सोन्याची आभूषणे व दानपेटीतील रोख रक्कम आज (सोमवार) चोरट्यांनी पळविली. अंदाजे २६ लाख रुपयांची लूट झाली आहे.
मंदिर रोज रात्री नऊ वाजता बंद केले जाते. तर, पहाटे पाच वाजता मंदिर उघडले जाते. रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात तीन चौकीदार तैनात असतात. आज सकाळी चौकीदार जगरूप रंधवा यादव याने मंदिर उडल्यानंतर त्याला धक्काच बसला. पार्श्वनाथाच्या मूर्तीवरील सर्व आभूषणे कुणीतरी पळविली होती. चोरट्यांनी मंदिराच्या मागील दाराची कडी इलेक्ट्रीक कटरच्या साहाय्याने कापून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर कुलूप तोडून पार्श्वनाथाची मूर्ती असलेल्या गाभाऱ्यात प्रवेश केला. ९३५ ग्रॅम सोने (१८ लाख ६१ हजार रूपये) अकरा किलो चांदी (सहा लाख रूपये) व दानपेटीतील दीड लाख रूपये रोख असा एकूण २६ लाख २० हजारांचा ऐवज पळविला. मंदिराच्या गाभाऱ्यातील व मागच्या दाराजवळील सीसी टीव्ही कॅमेरे सुरू असल्याने चोरटे या कॅमेऱ्यात "ट्रॅप' झाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. या कॅमेऱ्याच्या तपासणीत तीन व्यक्ती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.