Thursday, July 28, 2011 AT 04:00 AM (IST)
Tags: accident, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - अपघाताच्या घटनांत घट करण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी रस्ता सुरक्षा मोहीम सुरू केली होती. त्यातही यंदाच्या सहा महिन्यांत 149 वाहन अपघात होऊन 167 जणांचा मृत्यू झाला. गतवर्षी 2010 मध्ये वर्षभरात 276 अपघातांत 308 जण मृत्यू पावले होते. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूकदारांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी बैठकीत दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात खासगी बस वाहतूकदार, काळीपिवळी चालक, मालक संघटना आणि पदाधिकारी, कंपनी मालक, ट्रान्स्पोर्ट मालक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गुंडावार उपस्थित होते. यावेळी जडवाहतूक, अपघात, पार्किंग व्यवस्था या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बी. डी. मडावी आणि सहायक परिवहन अधिकारी आदे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, यापूर्वी घडलेल्या घटनांचा सचित्र आढावा सांख्यिकी माहितीद्वारे दिला. यात सहा महिन्यांत 149 वाहन अपघात होऊन 167 जणांचा मृत्यू झाला. गतवर्षी 2010 मध्ये वर्षभरात 276 अपघातांत 308 जण मृत्यू पावले होते, अशी माहिती देण्यात आली. घडलेल्या अपघातांचे मुख्य कारण सांगण्यात आले. यात जडवाहतूक, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणे, आदी कारणे सांगण्यात आली.