माता महाकालीवर अपार श्रद्धा ठेवून हजारो भक्तगण दरवर्षी यात्रेनिमित्त चंद्रपुरात दाखल होतात आणि तिच्या चरणी नतमस्तक होऊन गावाकडे परततात. येथे येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न होतो. मात्र, हा नुसता देखावा असून, येथे येणाऱ्या भाविकांना विविध समस्यांना सामना करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे.
विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी महाकालीचे देवस्थान एक महत्वाचे शक्तिपीठ आहे. चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या देवी महाकालीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेत नांदेड, परभणी, उस्मानाबाद, माहूर आणि आंध्र प्रदेशातील भक्त मोठय़ा संख्येने येतात. लाखोंच्या संख्येने येणारे भाविक कसे राहतात, कुठे झोपतात, कुठे खातात, कोणते पाणी पितात याच्याशी कुणालाच काही सोयरसुतक नाही. केवळ एक परंपरा म्हणून ही जत्रा भरते. मात्र, जिल्हा प्रशासन, नगर प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन नवे काही करण्यास पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे येथील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे मागील शंभर वर्षांपासून सुरू असलेल्या यात्रेतील गर्दी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. केवळ धर्मशाळा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था हा अपवाद सोडला, तर कोणतीही नवी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
मंदिर व पालिका प्रशासनातर्फे मंडप टाकून भाविकांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, नुकत्याच झालेल्या अकाली पावसाने तंबू उडून गेले. वादळामुळे काही ठिकाणचे मंडप फाटले. पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांचे अन्नधान्य भिजले. त्यामुळे वेळेवर काही भाविकांनी दुकानातून विकत घेतलेल्या खाद्यान्नावर भूक भागवली. यात्रा परिसरात घाणीचे साम्राज्य, दूषित पाणी असून, भाविकांना राहण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. वादळवारा आणि अकाली पावसामुळे भाविकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. मात्र, याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. महाकाली मंदिर व्यवस्थापनाने पाच हजार चौरस फूट जागेत चार मजली धर्मशाळेचे निर्माण केले आहे. दोन हजार चौरस फुटांचे सभागृह आहे. त्यात नि:शुल्क निवास व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तीसुद्धा अपुरी पडत असल्याने यात्रेकरू तंबू ठोकून, झाडाच्या आडोशाने, पाण्याच्या टाकीखाली रात्र काढताना दिसतात. कडक उन्हाळ्यात ही यात्रा भरत असल्याने दिवसभर अंग भाजून निघते. कुठेच थंडावा नाही. शरीराची लाही लाही होत असतानाही भाविकांना ते सहन करावे लागते.
४० खोल्यांची एक धर्मशाळा सोडली, तर थांबण्याची व्यवस्था कुठेच नाही. या धर्मशाळेची क्षमता केवळ दोन हजारांची आहे. म्हणजे, यात्रेकरूंच्या तुलनेत एक टक्काही नाही. शिवाय, उपलब्ध असलेल्या धर्मशाळेची स्वच्छता राखण्यात भाविकांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात घाण दिसून येते. यात्रा काळात स्वच्छता राखण्यासाठी नगर पालिकेचे सफाई कामगार येत नाही. त्यामुळे शिळे अन्न, पोळी फेकलेल्या ठिकाणीच स्वयंपाकाची सोय करावी लागते. स्वयंपाक करणे, जेवण करणे, झोपणे आणि सकाळी आंघोळ आणि प्रातर्विधीही एकाच स्थळी उघडय़ावर होत आहे. शिळे अन्नही कुठेही फेकून दिले जात असल्याने दरुगधी पसरत आहे.
५० हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. मंदिर परिसरात काही ठिकाणीच नळ लावण्यात आले आहेत. मंदिरानेही स्वत:ची यंत्रणा उभारली, पण भाविकांची संख्या पाहता ही व्यवस्था अत्यंत तोकडी आहे. शिवाय, या नळातून मिळणारे पाणी गरम असते. थंड पाण्याचा पत्ता नाही. या गरम पाण्यावरच भाविकांना तहान भागवावी लागते. त्यामुळे त्रस्त झालेल्या काही भाविकांनी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि यात्रेतील असुविधांची माहिती दिली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांची गैरासोय होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाईल, असे आश्वासन दिले.
चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेटजवळ असलेली पोलीस चौकी एरवी बंद दिसत होती. मात्र, यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, त्यांना वेळेवर मदत मिळावी, या उद्देशातून ती सुरू करण्यात आली आहे. मात्र, येथे नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी भाविकांची मदत करताना दिसत नाही. माता महाकालीची पहाटे ३ वाजेपासून महापुजेला सुरुवात झाली. पूजन आंघोळीनंतर दही व तुपाचा अभिषेक करण्यात आला. देवीला दागिने परिधान केल्यानंतर ५.३० वाजता महाआरती पार पडली. यापुढे तरी येथे आलेल्या भाविकांना समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी जिल्हा नगर प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा, अशी आशा उराशी बाळगून परतीच्या प्रवासाला लागले आहेत.