चंद्रपूर - अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला समर्थन देत लोकपाल विधेयकामुळे राजकीय व्यक्तींशिवाय चित्रपटसृष्टीत येणारा काळा पैसा निश्चितपणे उघड होईल, असे मत मराठी चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य भवनात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आयोजित प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे उपस्थित होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ यांनी प्रास्ताविक केले. ही प्रकट मुलाखत ऍड. वर्षा जामदार आणि प्रा. जयश्री कापसे यांनी घेतली. मुलाखतीची सुरवात श्री. दामले यांनी बालपणातील आठवणींतून केली. लहान असताना शालेय शिक्षणात एनसीसी कॅडरचे विद्यार्थी होते. सैन्यात जाण्याची इच्छा होती. मात्र, शारीरिक साथ नव्हती. गाणी, कॅरम आणि बुद्धिबळ खेळात रस होता. कुटुंबातच नाटकाचा वारसा असल्याने शालेय नाट्यस्पर्धेत काम करण्याची संधी मिळाली. छंद म्हणून जोपासलेले नाटक आता व्यवसाय झाल्याचेही त्याने यावेळी सांगितले. नाटक हे टीमवर्क आहे. त्यामुळे कुणा एकट्यामुळे प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. सर्व कलावंतांचा चांगला समन्वय असणे आणि पडद्यामागील कलावंतांची साथ महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. नाटकात काम करताना रिलॅक्स होण्यासाठी गमतीजमती कराव्या लागतात, अभिनयातील बेसिक गोष्टी नाटकातून शिकायला मिळतात. टीव्ही मालिका केवळ पैशासाठी, तर नाटक प्रेक्षकांच्या प्रेमापोटी करत असल्याचेही प्रशांतने सांगितले. आतापर्यंत नऊ हजार 600 प्रयोग करून लिम्का रेकॉर्ड झाले असून, 10 हजार नाटकांचा टप्पा गाठून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याचा विश्वास बोलून दाखविला.