पूर्वी मांढळचे नाव मातंगपूर असल्याचे इतिहासाचे जाणकार सांगतात. कालांतराने मातंगपूर शब्दाचा अपभ्रंश होऊन मांढळ हे नाव पडले. पूर्वी येथे कुस्त्यांची आमदंगल मोठ्या स्वरूपात होत असे. तान्ह्या पोळ्याचीही येथे परंपरा होती. आमनदीमुळे शिंगाडा व मासेमारीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणात चालत असे. काळाच्या ओघात हे सारे कमी झाले असले तरी पंचक्रोशीत मांढळ गावाची वेगळी ओळख आहे.
.....
राजघराण्याचे गाव
तत्कालीन मध्य प्रांताची राजधानी असलेल्या नागपूर येथील राजे रघुजी भोसले यांच्या घराण्याचे हे गाव. गावात भोसल्यांचा वाडा आजही पहावयास मिळतो. येथील दोन गावतलावांचे पाणी शेतपिकांना दिले जात होते. त्यामुळे भोसले राजांनी तलाव सरकारजमा न करता शेतकऱ्यांना तलावाचा मालकी हक्क मिळवून दिला. भोसले राजांनी येथील सामाजिक प्रथा-परंपरा कायम ठेवत सर्व जातीय सलोखा अबाधित ठेवला.
.....
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक
आजघडीला गावात हिंदूंची दहा देवालये आहेत. मुस्लीम बांधवांची एक मशीद आहे. बौद्धांची दोन प्रार्थनास्थळे आहेत. विशेष म्हणजे येथील हिंदू देवालयाच्या मंडळाचे अध्यक्ष मुस्लीम समाजाचे पुरोगामी नागरिक निस्सारभाई कुरैशी आहेत. गावात सर्व जातींमध्ये सामाजिक सलोखा आहे. इतरांनी आदर्श घ्यावा, असा येथील लोकमानस आहे.
.....
दृष्टिक्षेपात मांढळ
लोकसंख्या : 15 हजार
क्षेत्रफळ 1342.34 हेक्टर
राष्ट्रीयीकृत बॅंक : 2
ग्रामपंचायती सदस्य : 17
गावातील वॉर्ड : 6
अंगणवाड्या : 6
पोलिस चौकी : 1
माध्यमिक विद्यालय : 5
कनिष्ठ महाविद्यालय :04
महाविद्यालय : 1
बचत गट : 42
वाचनालय :01
महिला मंडळ : 3
कुटुंब : 1713
सरकारी गोदाम : 2
नाट्यमंडळ : 3
जिल्हा मध्यवर्ती बॅंक : 1
कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय : 1
घरे : 1530
मोफत विधी सल्ला केंद्र : 1
....
तालुक्यातील मोठे व्यापारी केंद्र
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मांढळ गाव तालुक्यातील मोठे व्यापारी केंद्र म्हणून उदयास आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेले मांढळ राज्याची उपराजधानी नागपूरपासून पूर्वेला साठ किलोमीटर अंतरावर आहे. पश्चिमेकडून-पूर्वेकडे वाहणारी आमनदी येथून अर्ध्या किलोमीटरवर आहे. त्यामुळे लगतच्या गावातील नागरिकांची येथे रेलचेल असते.
.....
जलस्वराज योजनेचे भिजतघोंगडे
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक व राजकीय वर्दळीचे केंद्र असलेल्या मांढळ येथे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. विकासाच्या अनेक योजना येथे प्रलंबित आहेत. स्थानिक प्रशासनाला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आजमितीस गावात 72 खाजगी विहिरी, 52 हातपंप, 23 सार्वजनिक विहिरी, 3 पाणी साठवणूक जलकुंभ आहेत. तरीही पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवते. याचे मुख्य कारण म्हणजे आमनदीवर कार्यान्वित होणाऱ्या जलस्वराज योजनेचे दहा वर्षांपासून भिजतघोंगडे कायम आहे. योजनेचा 65 लाखांचा निधी पाण्यात गेला. त्यामुळे नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकत नाही.
....
प्रतिक्रिया
महात्मा गांधी तंटामुक्त गावसमितीची संकल्पना चांगली आहे. यामुळे गावाची एकात्मता आणि अखंडता जोपासली जाते. या कामात सर्वांचे सहकार्य मिळाल्याने पहिल्या वर्षाचा 8.75 लाखांचा विशेष पुरस्कार समितीला मिळाला. तंटामुक्त समितीने शासनाच्या प्रस्तावित योजनांच्या अंमलबजावणीसह इतर प्रकरणे निकाली काढली. घटस्फोटित जोडप्यांचे मनोमीलन, आंतरजातीय विवाह, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून दिली. गावात विश्वासाचे वातावरण तयार केले. त्यामुळे विशेष बाब म्हणून पुरस्कार देण्यात यावा.
- देवीदास तिरपुडे, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती
.....
गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातुलनेत आरोग्याच्या सोयी-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे येथे किमान साठ खाटांचे नवीन रुग्णालय होणे गरजेचे आहे. गावात आरोग्याची चांगली सुविधा निर्माण झाल्यास रुग्णांची पायपीट थांबेल. शिवाय पैशाचीही बचत होईल. गरिबांचे प्राण वाचतील व रुग्णसेवेवर विश्वास बसेल.
- बाबुराव पिल्लेवान, माजी शिक्षण सभापती
आम नदीवर प्रस्तावित जलस्वराज योजना पाणीपुरवठा प्रकल्पाचा फज्जा उडाला. ही योजना दहा वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे 65 लाखांचा निधी पाण्यात गेला. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. जलकुंभात पाण्याचा थेंबही नाही. जुन्या नळयोजनेतून अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे.
- विनय गजभिये, सामाजिक कार्यकर्ते
.....
25-30 वर्षांपूर्वी येथील भोलाहुडकीच्या उत्खननात अनेक ऐतिहासिक वस्तू सापडल्या होत्या. त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. पांडव पंचमीला येथे दरवर्षी कुस्त्यांची आमदंगल भरविली जाते. त्यासाठी मैदानाची व्यवस्था व्हावी. तसेच येथील भकास झालेल्या टेकडीचे सौंदर्यीकरण करून गावाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा.
उपासराव भुते, जि.प. सदस्य
....
गावात साडेसात-आठ तासांचे भारनियमन नित्याचेच झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी, लघुउद्योजक व शेतकरी मेटाकुटीस आले आहे. विजेची अडचण लक्षात घेऊन येथे 33 केव्हीचे वीज उपकेंद्र स्थापन करावे. यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल. तसेच विद्यार्थी, व्यापारी, उद्योजकांना दिलासा मिळेल.
- रोशन सोनकुसरे, सरपंच मांढळ
मांढळ परिसरात शेतकरी व पिढीजात मेंढपाळांची संख्या मोठी आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. जनावरांच्या उपचारासाठी येथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. परंतु सोयी-सुविधांचा अभाव आहे. योग्य उपचाराअभावी जनावरांचा जीवही जातो. त्यामुळे जनावरांच्या उपचारासाठी चांगले रुग्णालय व डॉक्टर, कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते
गावाचा विस्तार झपाट्याने होत आहे. बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय जागेवरील अतिक्रमण वाढत असल्याने स्थानिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आबादी जागा मिळाल्यास हक्काचे घर बांधता येईल. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे.
- यशोधरा नागदेवे, माजी सभापती, पं. स. कुही
मांढळ परिसरात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शैक्षणिक संस्थांचे जाळेही गावात आहे. पेन्शनर्सची संख्या मोठी असल्याने सर्वांच्या सोयीसाठी गावात महसुली कार्यालय होणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळेल.
- वंदना निरगुळकर
गावात पक्के रस्ते नाही. अरुंद रस्त्यांच्या लगत असलेली खुली गटारे मृत्यूला निमंत्रण देतात. याशिवाय कचऱ्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रोगांना आमंत्रण मिळत आहे. खुली गटारे भूमिगत व्हावीत.
- वैशाली चौधरी
तालुक्याचे व्यापारी केंद्र असलेल्या मांढळ येथे बसस्थानक नाही. त्यामुळे उमरेड, नागपूर, भंडारा येथील आगारातून येणाऱ्या बस भरचौकात उभ्या राहतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. एखादवेळी मोठ्या अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे गावात बसस्थानकांची सोय व्हावी.
सुधा मेश्राम, शिक्षिका
........
गावात उद्यान नसल्यामुळे बच्चेकंपनीचा हिरमोड होतो. याशिवाय वृद्ध मंडळींना सकाळ - संध्याकाळ फिरण्यासाठी हक्काचे ठिकाणी नाही. त्यामुळे प्रशासनाने गावात किंवा गावाबाहेर एका उद्यानाची निर्मिती करणे गरजेचे आहे. उद्यानामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडेल.
शोभा मेश्राम, ग्रा. पं. सदस्य
..............
गावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आहे. परंतु नऊ - दहा महिन्यांपासून तेथील कामकाम ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज मिळाले नाही. आता रब्बी हंगाम सुरू झाला. शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. नवे सरकार सत्तेत आले. त्यांनी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा.
मोहन मते, अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी
...
मांढळ परिसरात मिरची व सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पिकांची खरेदी - विक्री केली जाते. त्यानंतर हा माल परप्रांतात नेला जातो. मिरची व सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग गावात उभारले गेले तर शेतकऱ्यांच्या पिकाला भाव व स्थानिकांना रोजगार मिळेल.
हरीश कडव, पं. स. सदस्य
.....
येथील लोकप्रतिनिधींचे विकासकामांकडे दुर्लक्ष आहे. गावातील विकासाच्या अनेक योजना प्रलंबित आहेत. विकासाच्या योजना गावात आणून त्यांची अंमलबजावणी करणे येथील लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तरच गावाचा चेहरा मोरा बदलेल.
भगवान दिघोरे, सामाजिक कार्यकर्ते
....
निसर्गाच्या बेभरवशीपणामुळे यावेळी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही शृंखला अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. हरदोली येथील आमनदीच्या घाटावर कोल्हापुरी बंधारा बांधल्यास पाणी अडवता येईल. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
- परमेश्वर शेंडे, सामाजिक कार्यकर्ते
...
जि.प. शाळेच्या इमारतीलगत मैदान आहे. या ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. परंतु, मैदानात मोकाट जनावरे, डुक्कर, कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. परिसरातील नागरिक मैदानात शौचास बसतात. त्यामुळे मैदानाला कंपाउंड असलेतरी नावापुरतेच आहे. या मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे.
शरद इटकेलवार, शिक्षक नेते
....
गावात अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांची संख्या मोठी आहे. गावातील तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या दारुड्यांची येथे गर्दी असते. बेरोजगार, विद्यार्थी दारूच्या आहारी जात असल्याने अवैध दारूविक्रीवर बंदी आणणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा.
- शकील शेख
यांना सांगा समस्या
खासदार कृपाल तुमाने : 9823288322
आमदार सुधीर पारवे : 9422829464
तहसीलदार कुही : 9422642842
खंडविकास अधिकारी कुही : 9764301052
सचिव ग्रा. पं. मांढळ : 9423605299
तालुका आरोग्य अधिकारी : 9923930167
हंसदास मेश्राम, कुही 9921438865