चंद्रपूर - चंद्रपूर वनवृत्तात सध्या वनरक्षकपदाकरिता भरतीप्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेत 36 जागांसाठी तीन हजार 200 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा प्रथम पुरुषांना 25 किलोमीटर, तर महिलांना 16 किलोमीटर पायी चालावे लागणार आहे.
चालण्याची चाचणी 12 सप्टेंबरला होत असून, या चाचणीतून एका पदास तीन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहेत. जे उमेदवार कमीत-कमी वेळात चाचणी पूर्ण करतील, त्यांचीच निवड होणार असल्याने ही चाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची होणार आहे. ही चाचणी सुरू असताना पारदर्शकता आणण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येईल. चालण्याच्या चाचणीत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची ठरवून दिलेल्या मापदंडाच्या अधीन राहून शारीरिक मोजमाप शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून घेण्यात येणार आहे. चालण्याच्या चाचणीत व शारीरिक मोजमापामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी 19 सप्टेंबरला होईल. चाचणीसाठी 12.50 एवढेच गुण ठेवण्यात आलेले आहेत. या मौखिक चाचणीचीदेखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.
अर्हता परीक्षेतील प्राप्त गुणांना 87.50 टक्के एवढे भारांकन देण्यात आलेले आहे. अर्हता परीक्षेतील 87.50 गुण व मौखिक चाचणीचे 12.50 गुण याप्रमाणे गुणवत्तायादी तयार करून उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात येईल. या सर्व चाचण्यांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचीच रिक्तपदांच्या प्रमाणात अंतिम यादी तयार होईल.
भरतीदरम्यान कोणाच्याही आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी; तसेच अशाप्रकारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी किंवा इतर कुणीही पैशाची मागणी केल्यास पोलिस ठाणे किंवा लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवावी.
-पी. कल्याणकुमार, उपवनसंरक्षक
उमेदवारांना मिळणार चाचणीची चित्रफीत
भरतीप्रक्रियेदरम्यान नोकरीकरिता मोठ्या प्रमाणात चढाओढ असते. अशावेळी आमिष दाखवून खोटी माहिती देऊन फसवणूक केली जाते. भरतीप्रकियेत संपूर्ण चित्रीकरण होणार आहे. एखाद्या उमेदवाराने सत्यता पडताळण्यासाठी चित्रफितीची मागणी केल्यास ती अल्प किमतीत उपलब्ध होईल
भरतीप्रक्रियेदरम्यान नोकरीकरिता मोठ्या प्रमाणात चढाओढ असते. अशावेळी आमिष दाखवून खोटी माहिती देऊन फसवणूक केली जाते. भरतीप्रकियेत संपूर्ण चित्रीकरण होणार आहे. एखाद्या उमेदवाराने सत्यता पडताळण्यासाठी चित्रफितीची मागणी केल्यास ती अल्प किमतीत उपलब्ध होईल