चंद्रपूर - मागील चार महिन्यांत वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले आहे. एकट्या चंद्रपूर वनविभागामध्ये 16 लाख 17 हजार 709 रुपयांची पीकहानी झाली आहे. शेतकऱ्यांना एवढ्या रकमेची नुकसानभरपाईसुद्धा देण्यात आली आहे. हा आकडा शासकीय आहे. हे नुकसान कोट्यवधींच्या घरात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच दोन मानवांचा जीवही श्वापदांनी घेतला असून, तब्बल 128 पाळीव जनावरांनाही त्यांनी ठार केले.
चंद्रपूर वनविभागामध्ये वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, मोहर्ली, चिचपल्ली, मूल, शिवणी व पळसगाव परिक्षेत्राचा समावेश आहे. हे क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्राला लागून आहे. या वनविभागाचे बरेचसे क्षेत्र बफरझोनअंतर्गत समाविष्ट आहे. त्यामुळे या विभागात वन्यप्राण्यांचा वावर फार मोठ्या प्रमाणात आहे. विशेषत: पट्टेदार वाघ, बिबटे आणि रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जंगलालगत राहणारे नागरिक सरपण वा इतर कारणांसाठी जंगलात जातात. त्यामुळे वन्यप्राण्यांद्वारे मानवांवर हल्ले झाले आहेत. गुराखी जनावरे जंगलात चरायला नेतात, तेव्हाही जनावरांवर हल्ले झाले आहेत. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात जंगलातील नैसर्गिक जलसाठे कोरडे होतात. त्यामुळे जंगलातील वन्यप्राणी शिकार आणि पाण्यासाठी गावांकडे आपला मोर्चा वळवितात. तेव्हाही त्यांच्याकडून हल्ले झाल्याच्या घटनाही या काळात झाल्या आहेत. एप्रिल- 2011 ते जुलै- 2011 या कालावधीत चंद्रपूर वनविभागाला वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे 31 लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. या काळात श्वापदांच्या हल्ल्यांत दोन व्यक्तींचा जीव गेला. त्यांना नुकसानभरपाई म्हणून चार लाख रुपये देण्यात आले. तसेच सहा जण जखमी झाले. त्यांनाही दोन लाख 66 हजार 525 रुपयांचे वाटप करण्यात आले. या चार महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत तब्बल 128 पाळीव जनावरांचे बळी गेले. त्यापोटी आठ लाख 75 हजार 675 रुपये जनावरांच्या मालकांना आर्थिक मदत देण्यात आली. तृणभक्षक प्राण्यांचाही उपद्रव या काळात मोठा होता. पिकांच्या हानीच्या जवळपास एक हजार 87 घटना या काळात घडल्या. त्यासाठी शेतमालकांना वनविभागाने 16 लाख 17 हजार 709 रुपये दिले.
या घटना अलीकडे वाढायला लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांद्वारे हानी झाल्यास त्याची माहिती जवळच्या वनाधिकारी यांच्याकडे 48 तासांच्या आत लिखित द्यावी लागते. तरच मदत मिळू शकते. प्रतिबंधित क्षेत्रात व संरक्षित क्षेत्रात एकट्याने जाऊ नये, असे आवाहन वनविभाग नेहमीच करतो; मात्र या प्रतिबंधित क्षेत्रात गावकरी जातात कसे, याचे उत्तर वनविभागाकडे नाही.
या हेल्पलाइनवर साधा संपर्क
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत काही अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती 48 तासांच्या आत द्यावी लागते; तरच मदत मिळू शकते. सोबत वन्यप्राण्यांच्या शिकारीवर आळा बसावा, यासाठी वनविभागाने हेल्पलाइन तयार केली आहे. यानुसार, 155314 या क्रमांकार थेट संपर्क साधता येऊ शकतो.