...अन् वेदना, भूक, तिरस्कार दूर झाला!
Friday, November 20, 2009
देवनाथ गंडाटे - सकाळ वृत्तसेवा
चंद्रपूर - घर बांधणे, विहिरी खोदणे, दगड फोडणे आदी कष्टाळू कामे करीत गाढवांच्या पाठीवरून भटकंती करीत पालावरचं जिणं सुरू होतं. दोन पुस्तक शिकल्यानंतर अव्यक्त भावनांना "बिराड"च्या रूपाने शब्दबद्ध करता आले. या शब्दांना महाराष्ट्राने दाद दिली. पण, खऱ्या अर्थाने "बिराड' स्थिरावले ते चंद्रपुरात. 23 जून 2003 तो दिवस आजही आठवतो. या दिवसापासूनच वेदना, तिरस्कार, दुःख, मनःस्ताप, चिरंतन भूक, अंधश्रद्धा यांचा शाप हळूहळू दूर व्हायला लागला, अशा भावना "बिराड'कार अशोक पवार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या.
गेल्या सहा वर्षांपासून येथील रहिवासी झालेल्या पवार यांना उद्या (ता. 20) दिल्ली येथे "युवा संस्कृती राष्ट्रीय पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाणार आहे. यानिमित्त भटकंती, पालावरचं जिणं आणि बॅंकेतील बचतगट असा प्रवास करणाऱ्या "बिराड'चा चंद्रपुरातील पहिल्या दिवसाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
23 जून 2003 चा दिवस. डोक्यावर उन्ह तापत होती. छातीत धकधक आणि धडधड करणाऱ्या रेल्वेने मी (अशोक पवार) चंद्रपूरला आलो. सोबत प्रकाश परांदे नावाचे मित्र होते. मळलेले कपडे आणि विखुरलेल्या केसांतून उष्णतेमुळे घामाच्या धारा वाहत होत्या. फाटक्या चप्पलमुळे रस्त्यावरची आग पायाला झोंबत होती. कुठेतरी रोजगार मिळेल, या आशेने वीटभट्टीवरील काम सोडून मित्र गजानन जानभोर यांच्या आग्रहाखातर इथे आलो होतो. बिराड वाचून जीवाभावाचा आणि मनापासून प्रेम करणारा मित्र भेटल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. फोनवरून नेहमीच बोलणे असायचे. चहापाणी घेतल्यानंतर त्यांनी सहकारी पत्रकार मित्रांची ओळख करून दिली. तिथे प्रमोद काकडे आणि नंदकिशोर परसावार नावाचे दोन मित्र भेटले. त्यांनीच जेवण आणि चप्पलची सोय करून पोट आणि पायाची आग विझविण्यास मदत केली.
अमरावती जिल्ह्यात वीटभट्टीवर काम करीत असताना कधी मातीमुळे कपडे भरायचे, तर भट्टीमुळे हात भाजायचे. या आगीतून बाहेर काढण्यासाठी जानभोर यांनी चंद्रपूरला बोलाविले होते. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत नेऊन अध्यक्ष बाबासाहेब वासाडे यांची भेट करून दिली. काहीतरी काम द्या, या विनंतीला बाबासाहेबांनी होकार दिला आणि आता नक्कीच बिराड स्थिरावेल, अशी आशा वाटली. लागलीच बॅंकेचे उपव्यवस्थापक रमेश लखमापुरे यांनी तोंडी मुलाखत घेतली. नव्यानेच सुरू झालेल्या बचतगट योजनेमध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्ती झाली. महिन्याला चार हजार रुपये मानधन ठरले. त्याच दिवशीपासून काम सुरू केले. पहिल्या दिवशी बचतगट म्हणजे काय, याची माहिती देणारी पत्रके वाचून काढली. ऑफीस, कर्मचारी हा प्रकार नवीनच वाटत होता. नोकरीचा पहिला दिवस अख्खा वर्षभरासारखा वाटू लागला. खुर्चीवर बसून टेबलवर पेनने कागदावर लिहिण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेतला. सतत भटकंती आणि पालावरचं जिणं जगलेला बिराड खुर्चीवर बसल्याचे पाहून स्वत:लाच स्वप्नवत वाटत होते. चोर, बदमाश ठरलेला मी चंद्रपूरवासी झालो. अस्थिर जीवनाचा शाप घेऊन जन्मलेल्या बेलदार समाजातील माझ्यासारख्याला गाव मिळालं, घर मिळालं. दोनवेळच्या पोटाची सोयही झाली आणि आता सन्मानाने जगू लागलो आहे, असेही पवार यांनी मोठ्या आनंदाने सांगितले.